पान:वाचन (Vachan).pdf/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


भिन्न असू शकतात नि असतात. वाचन व्यक्तिसापेक्ष असतं. तुम्ही मजकूर कसा आत्मसात करता, यावर ते अवलंबून असतं. लिखित संहितेचा बोध होणे म्हणजे वाचन. जे समजलं नाही ते वाचन नव्हे. वाचन म्हणजे कळणे. ते कर्मकांड नाही, ती प्रक्रिया आहे. तो उपचार नाही तर ती पद्धती (Therapy) होय. एकाग्रता तिची पूर्वअट असते. मगच परिणाम शक्य असतो. वाचन ही मन नि मेंदू, भावना व विचार, शरीर नि मन यांची संयुक्त क्रिया होय. ती एक सजीव, निरंतर क्रिया असते. बोध, अबोध स्वरूपात ती चालू असते. वाचनपूर्व, वाचनवेळी व नंतरही ती निरंतर सक्रिय असते.
५.३.२ वाचन : एक कृती

  वाचनाच्या स्वरूप आणि व्याप्तीचा विचार करत असताना ते नक्की काय आहे? कृती, कला, कौशल्य की विज्ञान, हे निश्चित करायचे झाले, तर त्या सर्व अंगांनी वाचनाचे स्वरूप समजून घ्यायला हवे. वाचन ही भाषिक चिन्हांच्या सांकेतिक आशयाचे आकलन करणारी प्रक्रिया वा कृती (Activity) असेल, तर ती कृती घडते कशी, हे समजून घेणे गरजेचे आहे. वाचनास सोद्देश कृती म्हटले जाते. ती विविध उद्देशांनी घडते; पण शिक्षणाच्या प्राथमिक अवस्थेत ती शिकवायला लागते. नंतर विकास पावत। ती अंगवळणी पडते. वाचक पुढे त्यात पारंगत होतो, प्रगल्भही होतो. ज्ञानप्राप्तीची कृती म्हणून वाचनाकडे आपण पाहतो. ती करत असताना आपले पूर्वज्ञान आणि अनुभव उपयोगी पडतो. त्यासाठी वाचकाचे भाषिक ज्ञान कामी येते. विद्यार्थिदशेत वाचन कृतीने आकलन कौशल्य जसे वाढत जाईल, तसे तो उत्साहाने वाचत जातो. वाचन विद्यार्थ्यांसाठी ज्ञानप्राप्तीची प्रेरणा ठरते. म्हणून प्रारंभीच्या काळात वाचन सहज व्हावे. सक्ती नको. मग गोडी जाते. ती संधी बनायला हवी. वाचन ही अंत:स्फूर्त कृती होईल, तर तिचे रूपांतर पुढे छंदात झाल्याशिवाय राहत नाही. छंदाचे रूपांतर तरुण वा प्रौढपणी (चांगल्या अर्थाने) नादात झाले, तर या कृतीने एक व्यक्तिमत्त्व सुजाण केले असे समजावे. यात शिक्षक व पालकांची सकारात्मक भूमिका मोलाची असते. प्रारंभीच्या काळात रोज अर्धा तास केलेला वाचनाचा सराव पुढे सवय बनून तिचे रूपांतर वृत्तीत होते. वाचनाच्या कृतीचे रूपांतर सवयीत व्हायचे तर वाचलेल्यावर चर्चा, देवाण-घेवाण, लेखन होणे महत्त्वाचे असते. त्यातून एकाच लिखिताचे भिन्न दृष्टिकोन समजण्यास मदत होते. या कृतीतून आत्मविश्वास वाढतो. उच्चार शुद्धता, भाषाधिकार, शब्दसंग्रह,

वाचन/६९