पान:वाचन (Vachan).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्ञान, अनुभूती होते. ही सारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते खरी. ती स्पष्ट नाही करता येत. फक्त त्याची प्रचिती शक्य असते. कबीरदासांनी या अनुभवाला ‘गूंगे का गुड' म्हटलं होतं. माणूस मुका आहे. त्याला गूळ चाखायला द्या. त्याला अनुभूती येते. चव कळते पण स्पष्ट, व्यक्त करता नाही येत. वाचन प्रक्रियेच्या दरम्यान वाचकात असंख्य उलाढाली, घालमेल, द्वंद्व चाललेले असते. तसं पाहणं, बोलणं, ऐकणं इत्यादी क्रियांमध्ये घडतंच असं नाही. घडलं तरी ते वाचनाइतकं प्रभावी नि परिणामकारी नसतं. म्हणून वाचनाचे स्वरूप, प्रभाव आगळा नि वेगळा असतो.
  आपण वाचतो तेव्हा लिखित सामुग्रीवर डोळे फिरवितो म्हणजे अंक, अक्षरादी चिन्हांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. ही क्रिया एकाच वेळी शारीरिक, मानसिक तशी बहुआयामीपण असते (भावनिक, तार्किक, तात्त्विक इ.). सेकंदात आपण मजकुरावर दृष्टिक्षेप टाकतो. सेकंदभरात ही क्रिया दोन-चार वेळा घडते. हा दृष्टिक्षेप १०० ते २०० अंशांतून होत राहतो. हे इतक्या क्षणार्धात घडतं की, लक्षातही येत नाही. म्हणून या क्रियेस, वाचनास ‘डोळ्यांच्या मदतीने केलेला विचार' असं म्हटलं गेलं आहे. हा विचार अर्थातच स्मरण, विश्लेषण, तर्क, तुलना इत्यादींद्वारे घडून येतो. वाचन प्रभाव अल्पकालिक असतो तसा दीर्घजीवीही. ते वाचन सामुग्री नि तुमची प्रतिक्रिया, प्रतिसाद यांवर अवलंबून असतं. वाचनातून नवकल्पना, उन्मेष, आविष्कार, ज्ञान इत्यादींची जागृती, निर्मिती होत असते. वाचन ही एक सजीव (Vital) प्रक्रिया आहे. आठवणे, कल्पना करणे, कारणमीमांसा, चिकित्सा, समीक्षा, तुलना, तर्क, विहंगावलोकन, ताडून पाहणे इत्यादी साच्या क्रिया-प्रक्रिया एकाच वेळी वाचताना घडतात. त्या समांतर, संयुक्त, व्यामिश्रपणे घडतात. व्याकरण, अर्थ, अन्वय, आशय, संदर्भ सर्वांचा मेळ घालत हे घडतं म्हणून वाचन प्रभावी, प्रवाही असतं. पटणे, न पटणे, सहानुभूती, टीका, स्मरण, गाळणे, सारं घडत राहतं.
 वाचन ही एक मानसिक कसरत असते. ती कष्टप्रद असली तरी अंतिमतः प्रभावकारी असते. ती माणसाच्या मनात हर्ष, शोक, आश्चर्य, आवेग, दु:ख दु:स्वास, अनुकरण सारं मजकूर बरहुकूम घडवून आणतं. तिचं पूर्वानुमान नसतं नि पश्चात भाकीतही नसतं. वाचन प्रभाव व्यक्तिपरत्वे भिन्न असतो. म्हणजे एकाच मजकुराच्या वाचनाच्या प्रतिक्रिया वा प्रतिसाद


१) वाचा आणि श्रीमंत व्हा - बर्क हेजेस पेंटॅगॉन प्रेस, नवी दिल्ली- पृ. १२४

वाचन/६८