पान:वाचन (Vachan).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्थबोध अशा अनेक अंगांनी वाचन कृती प्रारंभीच्या काळात उपकारक सिद्ध होते. वाचन, उच्चार दोष या विद्यार्थी वयात दूर होतील, तर एक चांगला अभिवाचक तयार होण्यास साहाय्य होय. वाचनामुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, गुणवत्ता कळण्यास मदत होते. प्रारंभीची प्रगट वाचन कृती म्हणजे उद्याच्या निर्दोष वाचनाचा पाया होय. तो शालेय वयात निर्दोष व मजबूत होणे आवश्यक असते.
५.३.४ वाचन : एक कला
 वाचन ही एक कला आहे. तिची दोन रूपे दिसून येतात - (१) प्रगट आणि (२) अप्रगट (मौन). वाचनाच्या प्रगट कौशल्याचा संबंध उच्चारण्याशी असल्याने व ते बाह्य स्वरूपाचे असल्याने घसा, स्वरयंत्र, जबडा, जीभ यांच्या स्थितीवर त्या व्यक्तीच्या वाचन कलेचे रूप आकारत असते. जेव्हा तिचे अप्रगट वा मौन रूपात अव्यक्त आविष्करण होत असते, तेव्हा तिचे रूप आंतरिक असते. या स्थितीत दृष्टी, बुद्धी, संवेदना, तर्क इत्यादी घटक महत्त्वाचे होतात. दोन्ही स्थितींमध्ये वाचन ही एक सांधेजोडीची कला (Kinesthetic Art) असते. तुम्ही ही जुळणी कशी करता त्यावर वाचन कला आकारते. कला हे सर्जन तसे वाचनही. वाचक लिखिताचा फक्त व्यक्त आशय नाही ग्रहण करत. शब्दार्थापलीकडचे जे अव्यक्त असते ते जाणणारा, वाचक खरा. लेखकाचा अंतरात्मा नि वाचकाचा अंतरात्मा (अंतर्ज्ञान) एक होणे म्हणजे वाचन परिपूर्ण अवस्थेस पोहोचणे. लेखनातील बिंबांपर्यंत पोहोचणे म्हणजे वाचन कला. दृश्य प्रतिमा, चरित्रांपलीकडचे स्वभाव विशेष, वृत्ती वाचता येणे म्हणजे कला. सर्वसाधारण उच्चारण म्हणजे वाचन नव्हे. अलीकडे वाचन सराव वाढल्याने वाचन गती वाढून ही कला गतिमान होते आहे. मिनिटाला ३०० ते ८०० शब्द वाचण्यापर्यंत प्रगत वाचकाची गती अचंबित, चकित करणारी खरी. गतिमान वाचन अधिकाधिक वाचनाकडे अग्रेसर होणारे असते. अग्रेसर वाचन उन्नत वाचनाकडे कूच करते, तर उन्नत वाचन प्रगल्भ वाचनाकडे. हा उंचावणारा आलेख वाचन कलेची पारंगतता अधोरेखित करत असतो. शिवाय तो वाचकाचे व्यक्तिमत्त्व सुजाण करतो.
 वाचनाला केवळ कौशल्य मानला जायचा काळ विसाव्या शतकातला. मुद्रणाचे प्रारंभिक युग वाचनाचे प्राथमिक युग होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाचनाने कलेचे रूप धारण केले. एकविसाव्या शतकात कलेची कूच विज्ञानाकडे झेपावते आहे. कधी काळी चिन्हांच्या संकेतांचे उच्चारण


वाचन/७०