पान:वाचन (Vachan).pdf/66

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


वाचलेले इतरांना सांगत ती सामाजिक होत जाते. वाचनामुळे आवड निर्माण होऊन न संपणारी ज्ञानपिपासा वाचकांत निर्माण होते. शिवाय तिचे फायदेही अनेक असतात. ज्ञानसंग्रह हा त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा लाभ होय. वाचनामुळे आपणास विविध साहित्य प्रकारांचा परिचय होऊन आपण बहविध वाचन करू लागलो की, वाचन बहुश्रुत होते. वाचन हा वेळ घालवायचा छंद नव्हे तर वेळ सत्कारणी लावण्याचा तो सृजनात्मक उपक्रम होय. जी माणसं नियमित वाचन करतात, ती नित्य व्यायामाप्रमाणे रोज अधिक प्रगल्भ होत राहतात. एकदा का माणसास वाचनाचा छंद जडला की, तो सुटणे अवघड. वाचन हे सकारात्मक व्यसन म्हटले तरी ते विधायकच म्हणायला हवे ना?
  वरील सर्व व्याख्यांमधून लक्षात येणारी गोष्ट अशी की, वाचन ही ज्ञानप्राप्तीची, आकलनाची पद्धत होय. याद्वारे आपण मुद्रित अंक वा अक्षरांचे सांकेतिक अर्थ समजून घेऊन माहितीचे संकलन, आकलन, विश्लेषण, संग्रहण करत राहतो. त्यातून एकंदरीतपणे आपणास समाज, जग, विविध ज्ञान-विज्ञान यांची समज येते. त्यातून आपल्या जाणिवा विकसित होतात. जगाचे गूढ उकलते. अज्ञान दूर होते. मनोरंजन होते. भाषांतरातून विविध भाषांमधील आशय आपल्यापर्यंत पोहोचतो. तीच गोष्ट लिप्यंतरणानेही घडते. शब्दज्ञान, जाणीव विकास, समज विस्तार यातून आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होते. वाचन हा एका अर्थाने जाणिवांचा विकास होय. म्हणून परिपाठ वा कर्मकांड म्हणून ते करून चालणार नाही. वाचन एक सायास, सहेतुक कृती होय.
५.३ वाचन : स्वरूप आणि व्याप्ती
वाचनाच्या अनुषंगाने अनेक उक्ती, सुभाषिते, सुविचार, घोषवाक्ये आढळतात. त्या प्रत्येकातून वाचनासंबंधी हेतू, उद्देश, परिणाम, वृत्ती, व्यवहार, परिवर्तन, विशेष इ. अधोरेखित होत असते. त्या सर्वांतून वाचन व्याप्ती व स्वरूपावर प्रकाश पडत असतो. म्हणून ते जाणून घेणे आवश्यक आहे. 'Reading is to the mind what exercise is to the body'.1 असे जोसेफ एडिसन (१६२२-१७१९)नामक ब्रिटिश निबंधकाराने म्हटले आहे. त्यानुसार शरीराला व्यायामाचे जे महत्त्व तेच वाचनाचे मनाला.


१) A Comprehensive Dictionary of Quotation- Three Ess Publication, Delhi.

वाचन/६५