पान:वाचन (Vachan).pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुंडाळी (Scroll)
 पूर्वी पपायरस (Papyrus) वनस्पती कुटून, चेचून ते भिजवून त्यापासून धागे तयार करून, ते विणून कागदासारखा पातळ पापुद्रा तयार करून त्यावर लिहिले जायचे. आपल्याकडे घायपातापासून भिजवून, कुजवून त्याच्या रेषा, धाग्यांपासून वाक, दोरखंड तयार केले जातात, तशीच ही काहीशी पद्धत. प्राचीन इजिप्तच्या पहिल्या राजवंशाच्या काळात (इ.स. पूर्व २४००) मध्ये पपायरसवर लिहून त्याच्या गुंडाळ्या दरबारात, ग्रंथालयात ठेवल्या जात असत. किंग नेफेरटीटी काकईच्या काळात अशा गुंडाळ्या उपलब्ध असल्याचे ऐतिहासिक नोंदींवरून दिसून येते. या गुंडाळ्या चिकटवून त्याच्या चोपड्या केल्या जात असत. हिरोडोटस या ध्वनिशास्त्रज्ञाने इ.स. पूर्व ९०० च्या दरम्यान पपायरस प्रथमतः ग्रीसमध्ये आणला. बिब्लॉस बंदरातून ग्रीसला पपायरसची निर्यात करण्यात आली होती असं सांगितलं जातं. हेलेनिस्टिक, रोमन, चिनी, हिब्रू तसेच मॅक्डोनियन संस्कृतीत पपायरस प्रचलित असल्याचे पुरावे आढळतात. ग्रंथांचे आद्यरूप, उगम म्हणून या गुंडाळ्यांचे ऐतिहासिक महत्त्व वादातीत आहे. (गुंडाळी वाचक व गुंडाळी फडताळाचे छायाचित्र पहा.)

वाचन/४४