पान:वाचन (Vachan).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४.४ ग्रंथ : उगम आणि विकास
 पुस्तके म्हणजे पृष्ठांची बांधीव शृंखला. लिखित पानांचा वाचनीय संग्रह म्हणजे ग्रंथ. पानांच्या बांधणीमुळे आपण पानं पिसा, पंखांप्रमाणे फाकू, पसरू, पिसारून (Fan open) वाचू शकतो. काळाच्या ओघात माती, लाकूड करत धातूचे झालेले टंच, टाक (Font) मुद्रण कलेचं वैभव होतं. आता अक्षरं, शब्द अंकीय युगात आभासी होत आहेत; पण इतिहास प्रवासात त्यांनी चर्मपत्रे, भूर्जपत्रे, पपायरस, वेत, पाम इ. वृक्षांच्या साली, पाठी, पानांवर हस्तलिखिताचं सौंदर्य खुलवलं होतं. तेही छोट्या-मोठ्या रूपांतून. गुंठाळ्या, भेंडोळ्यांचीपण एकेकाळी पुस्तकं होती. नंतर त्यांची बाडे, चोपड्या झाल्या. ठशांपासूनचा ई-बुकपर्यंतचा पुस्तकांचा प्रवास, इतिहास म्हणजे माणसाच्या अविश्रांत श्रम, प्रयत्न, संशोधनाची विकास गाथाच!
४.४.१ प्राचीन काळ

 कालप्रवासात माणसाने लिहिण्यासाठी दगड, चिखल, वाळू, पाने, साली, चामडे, पत्रे (Teen sheets), हाडे, कवट्या, फरशा वापरल्या. मिळेल त्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या ध्यासाने भाषा, लिपी, लेखन, भाषांतर, ग्रंथ जन्माला घातले. प्रारंभीच्या माती, चिखलाच्या विटा म्हणजे लिहिण्याचं मृदू माध्यम. दगडावर कोरणं कष्टाचं म्हणून माणूस माती, वाळूवर रेघोट्या ओढू लागला खरा; पण ते वारा, पावसात नि वादळात जपणं अशक्य होतं. म्हणून मग त्यानं चिखलाचे ठसे बनवले. पुढे तेच लाकडी, लोखंडी झाले. बृहतकाय अक्षरं महत्प्रयासाने छोटी होत गेली. ते कमी जागेत अधिक मजकूर, चित्र मावण्या, कोंबण्याच्या ध्यास-धडपडीतून. बोरू, ब्रशचे टाकसुद्धा याच धडपडीतून टोकदार होत अक्षर ठशीव, मोत्याचे झाले. अश्म युगानंतर नि धातुयुगापूर्वी लाकडी पाचरावरही (cuneiform) लिहिण्याचा प्रघात होता. मेणाचे ठसेपण मधल्या काळात वापरले गेले. मेणावर अणकुचीदार टाकाने लिहिले, कोरले जायचे. तत्कालीन पाठशालांच्या प्राथमिक काळात धुळपाटी, ठसे, शाई, नीफ हीच लेखनाची साधने होती. मेणाची पुस्तकं असत. (‘प्राचीन लेखन साहित्य' छायाचित्र पहा.)

वाचन/४३