पान:वाचन (Vachan).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोथी, बाड, बखर ते ई-बुक, किंडलचा प्रवास, Talk to Text पर्यंतचा विकास ही पुस्तकविषयक सातत्यपूर्ण संशोधनाचीच परिणती होय. आभासी, अंकीय जगातलं पुस्तक आज फोल्डर, फाईल, पीडीएफमध्ये उपलब्ध झाले आहे.
  ग्रंथ, पुस्तक या अर्थाने इंग्रजीत वापरला जाणारा Book हा शब्द जुन्या इंग्रजीतील 'Boc' शब्दापासून निर्माण झाला आहे. त्याचा व्याकरणाशी संबंध असून, प्राथमिक व्याकरण शिकविणा-या पुस्तकांना (Readers) पुस्तक समजण्याचा प्रघात प्रारंभी होता. लिहिण्यास, वाचण्यास शिकविण्यास उपयोगी साधन म्हणजे जुनी अंकलिपी होय. ती अंक नि अक्षरं (स्वर, व्यंजन, शब्द इ.) शिकण्यास साहाय्यभूत ठरत असे. लॅटिन, संस्कृतादि भाषात ती लेखनासाठी वापरली जाते. पूर्वी लिहायचे लाकडी ठसे हे मातीच्या ठशानंतरच्या काळात वापरले जायचे (Beechwood) . ठसा या अर्थाने पुस्तक शब्द वापरला जायचा. लॅटिनमधील Librum शब्द झाडाच्या आतल्या गाभ्यापासून बनविलेल्या ठशास वापरला जायचा. पुढे यातून त्याचा संग्रह म्हणजे Library झाला. डच, गॉथिक, जर्मन इ. भाषा, साहित्यात Boek, Buch, boka सारखे शब्द हे इंग्रजी BOOKMOM पर्याय म्हणून वापरले जातात.

 माणसाचं भावसंचित जर कुठे परंपरेतून प्रतिबिंबित होत आलं असेल, तर ते ग्रंथांतूनच. मनातलं शब्दबद्ध करून ठेवण्याच्या मनोव्यापारास 'ग्रंथित करणं' असं म्हटलं गेलं आहे. ग्रंथ म्हणजे कागदावर लिहिल्या गेलेल्या दस्तऐवजांचा बांधीव संग्रह. सहज देवाण-घेवाण, वहन, प्रेषणाच्या गरजेतून अगडबंब ग्रंथ काळाच्या ओघात हलके-फुलके होत गेले. सुसंगत वाक्यसंग्रह म्हणजे ग्रंथ. पुस्तक शब्दाचा अर्थ होतो घडण. पूर्वी भाजलेल्या विटा इष्टिकाग्रंथ (क्यूनिफार्म आकृती पाहा) शिळा, धातूचे पत्रे, चमडे, पापुद्रे (पपायरस) इत्यादींवर लिहायचा प्रघात होता, हे ग्रंथाच्या इतिहासातून स्पष्ट होते. पूर्वसंचित जतन करण्याच्या गरजेतून आणि मानवाच्या सातत्यपूर्ण प्रयोग, प्रयत्न आणि संशोधनाचे फलित म्हणजे विद्यमान ग्रंथ, पुस्तके, कोश होत. ग्रंथपूर्व काळात हे सारे ज्ञानसंचित ‘श्रुति स्मृती' पद्धतीने म्हणजे ऐकलेले लक्षात ठेवून जपले गेले. त्या काळात स्मरणशक्ती म्हणजे बुद्धिमत्ता मानली जायची. गुरूमुख हेच त्या काळी ज्ञानसंपादनाचे एकमेव माध्यम होते. मुखोद्गतता हे विद्वत्तेचे लक्षण मानले जायचे. प्राचीन वेद वाङ्मय याच पद्धतीने जतन झाले होते. त्यामुळे लेखनाचा नक्की प्रारंभ केव्हा आणि कसा झाला हे सांगणे कठीण; पण इष्टिका ग्रंथ (क्यूनिफॉर्म) हेच आद्यलिखित रूप सध्या आपल्या हाती आहे.

वाचन/३९