४. ग्रंथ निर्मिती व ग्रंथालय विकास
४.१ ग्रंथ
सृष्टीच्या विकासात प्राणी व मनुष्य यांच्यामध्ये फरक घडवून आणणारे जे घटक, वृत्ती, गुण आहेत, त्यात हास्य, विचार, लेखन, सृजन, कला इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. प्राण्यापासून मनुष्य ज्या उन्नत अवस्थेस पोहोचला, त्यात आविष्कार, अभिव्यक्ती इत्यादी आंतरिक ऊर्मी नि ऊर्जांचा मोठा वाटा आहे. मनुष्याने प्रारंभीच्या काळात हातवारे करून एकमेकांशी संवाद सुरू केल्याचं सांगितलं जातं. मग तो भय, हर्ष, शोक इत्यादी भावना ध्वनीने व्यक्त करू लागला. ध्वनीनं मग चिन्ह, चित्रांचं रूप धारण केलं. शिकार करत भटकणारा, झुंडीत राहणारा वनमानुष गुंफेत राहात स्थिर झाला. शेतीनं त्याला वरदान दिलं नि तो पुष्ट झाला. मेंदूची वाढ होईल, विकास होईल तसे त्याने अग्नी, चाक, हत्यारे शोधत श्रम बचतीचे उपाय शोधले तसेच तो उन्नत साधनांच्या मागे लागला. आविष्कार नि अभिव्यक्तीच्या नानापरी शोधणाऱ्या माणसाने गुंफांमध्ये कोरणे, ओरखडणे स्मरणासाठी सुरू केले. अभिव्यक्तीसाठी तो चित्रं काढू लागला. चित्र, चिन्हांना हळूहळू सार्वजनिक रूप मिळालं. सूर्य, अग्नी, प्राणी, पक्षी, माणूस चित्रे सूचक बनत गेली. मग धोक्याची, भयाची चिन्हं देव, दैव, दैत्य बनत माणसांनी पूजा बांधल्या. त्या निसर्गाशी इमान बांधायचं म्हणून आपत्ती, भयमुक्तीसाठी तो गाऊ, नाचू लागला आणि सामूहिकपणे प्रतिकार करू लागला. शेकोटीभोवती बसून सांगणारा माणूस लिहिता झाला. लिहिणं त्याची पुनरावृत्ती त्याची गरज बनली. मग त्याने ठसे, ठोकळे, टंच टाक बनविले.