पान:वाचन (Vachan).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वर्तमान तमिळनाडूमधील चिकाकोल, गंजाम इ. प्रदेशांत ही लिपी प्रचलित होती. कलिंग लिपी म्हणजे वर्तमान देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिप्यांचे पूर्वरूप वा पूर्वखुणा होत.
६. तमिळ लिपी
 सातव्या शतकात तमिळ लिपी उदसाय आली. या लिपीवर ब्राह्मी लिपीचा प्रभाव आहे. आज मात्र ही स्वतंत्र लिपी म्हणून विकसित झाली आहे.
७. वट्टेकुत्तु लिपी
 ही लिपी गतीने नि घसटून लिहिली जाते. सातव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत ती वापरली जायची. तत्कालीन दरबारी कागदपत्रात या लिपीचे पुरावे दिसून येतात. दक्षिण लिपीतील शेवटची म्हणून पूर्ववर्ती तेलुगू, कन्नडमध्ये हिचे अस्तित्व दिसते. या लिप्यांत साधर्म्य असूनही लेखनशैली भिन्न दिसून येते.
हस्तलिखित ते मुद्रण
 आज आपण जी मुद्रित पुस्तके वाचतो ती इ.स.च्या सातव्या शतकापासून ते १५व्या शतकापर्यंतच्या लेखन विकासाची परिणती होय. लॅटिन साहित्य चर्मपत्रांवर लिहिले जायचे. ते बांधणे, ठेवणे, वाचणे कठीण होऊ लागले. पृष्ठ संख्या वाढ हे त्याचे कारण होते. हलक्या व पातळ लेखन साधनाच्या गरजेतून हात घडणीचा कागद (Hand made paper) जन्माला आला. तिकडे कित्ता करणे वाढत्या वाचक संख्येने अशक्य झाले. त्यातून मुद्रण यंत्र जन्माला आले. आजची मुद्रित पुस्तके म्हणजे माणसाच्या लेखन विकासाचे फलित होय.

■■

वाचन/३६