पान:वाचन (Vachan).pdf/36

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या भाषांची वर्णमाला आणि देवनागरी वर्णमालेतील साधर्म्य हेच अधोरेखित करते.
३.३.४.२ (ब) दक्षिणी शैलीतील लिप्या
१. पश्चिमी शैली
 ही लिपी इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत प्रचलित होती. पश्चिमी लिपी प्राचीन ब्राह्मी लिपीतून जन्मली. पश्चिम भारतातील काठेवाड, गुजरात, नाशिक, खानदेश, सातारा, हैद्राबाद, कोकण, म्हैसूर अशा विस्तृत प्रदेशांत ही लिपी प्रचलित होती. पश्चिमी भारतातील व्याप्त प्रदेशावरूनच या लिपीस ‘पश्चिमी लिपी' असे नाव पडले होते. मराठी, गुजराती, हिंदी, कोकणी भाषा आणि लिपीतील साम्य हेच दर्शविते. मोडी लिपी ही पश्चिमी लिपीचे आद्यरूप म्हणून ओळखले जाते.
२. मध्य प्रदेशी लिपी
 पश्चिमी लिपीशी साम्य असले तरी स्वतंत्र वळणाची लिपी म्हणून मध्य प्रदेशी लिपीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. या लिपीतील वर्णमाला समकोनी आहे. यात उभ्या, आडव्या रेषांचे प्राबल्य आहे. पश्चिमी लिपीतील गोलाकार वळणांच्या अभावामुळे या लिपीचे वेगळेपण स्पष्ट होते. ही लिपी हैद्राबाद, बुंदेलखंड, मध्य प्रदेश इ. प्रांतात वापरात होती.
३. तेलुगू/कानडी लिपी
 दक्षिण महाराष्ट्र-सोलापूर, विजापूर, धारवाड, हैद्राबाद, म्हैसूर, मद्रास (म्हणजेच आजचा कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूचा उत्तरी भाग) म्हणजे या लिप्यांचे क्षेत्र होय. पाचव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत या प्रदेशांची लिपी एक होती. विशाखापट्टणम्, गोदावरी, कृष्णा, नेल्लोर जिल्ह्यांतही तिचा वापर होता.
४. ग्रंथ लिपी
 मल्याळम्, तमिळ लिप्यांचे पूर्वरूप म्हणजे ग्रंथ लिपी होय. सातव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत ही लिपी प्रचलित होती. आर्कोट, सालेम (सेलम), त्रिचनापल्ली, मदुराई, तिन्निवेली जिल्ह्यात ग्रंथ लिपी वापरली जात असे. तुळू संस्कृत ग्रंथांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
५. कलिंग लिपी

 इसवी सनाच्या सातव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत कलिंग लिपी अस्तित्वात होती. तत्कालीन कागदपत्रात हिचा वापर दिसून येतो.

वाचन/३५