पान:वाचन (Vachan).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(१७) महाराष्ट्र, (१८) मणिपूर, (१९) मेघालय, (२०) मिझोरम, (२१) नागालँड, (२२) पंजाब, (२३) पश्चिम बंगाल, (२४) राजस्थान, (२५) सिक्कीम, (२६) तमिळनाडू, (२७) तेलंगणा, (२८) त्रिपुरा, (२९) उत्तर प्रदेश, (३०) उत्तराखंड ही ती ३० घटकराज्ये होत. (१) अंदमान आणि निकोबार बेटे, (२) चंदिगड, (३) दादरा आणि नगर हवेली, (४) दमण आणि दीप, (५) लक्षद्वीप, (६) पोद्दुचेरी (पाँडेचरी) हे केंद्रशासित प्रदेश आहेत. या घटकराज्य व केंद्रशासित प्रदेशांत पुढील २२ भाषांमध्ये राज्यकारभार चालतो. त्या भाषा आहेत - (१) आसामी, (२) उडिया, (३) उर्दू, (४) कन्नड, (५) काश्मिरी, (६) कोकणी, (७) गुजराती, (८) डोगरी, (९) तमिळ, (१०) तेलुगू, (११) नेपाळी, (१२) पंजाबी, (१३) बंगाली, (१४) बोडो, (१५) मणिपुरी, (१६) मराठी, (१७) मल्याळम्, (१८) मैथिली, (१९) संथाळी, (२०) संस्कृत, (२१) सिंधी आणि (२२) हिंदी. या घटनामान्य भाषा खालील १३ लिपींमध्ये लिहिल्या जातात(१) अरबी, (२) आसामी, (३) बंगाली, (४) देवनागरी, (५) गुजराती, (६) गुरुमुखी, (७) कन्नड, (८) मल्याळम्, (९) ओडिआ, (१०) ओलचिकी, (११) तमिळ, (१२) तेलुगू आणि (१३) उर्दू.
३.३.१ भारतीय लिपी : उगम आणि विकास
उगम

  वर्ण अथवा अक्षरांना परंपरेने अमर (अक्षर) मानण्यात आले आहे. भगवद्गीतेत तर अक्षराना ‘ब्रह्म' मानण्यात आले आहे. ‘अक्षरं परं ब्रह्मम।। ईश्वर साकार असतो, तसा निराकारही. परंतु, अक्षरवृत्ती मात्र साकार नि मूर्त असते. माणसात आविष्कार आणि अभिव्यक्तीवृत्ती (Expression) जितकी सहज, स्वाभाविक तितकीच संवादाचीही (Communication). अभिव्यक्ती नि संवादाशिवाय माणसास चैन पडत नाही. व्यक्त होण्याच्या बेचैनीतूनच लिपीची निर्मिती झाली आहे. आदिमानव जो पूर्वी जंगलात रहायचा, भटकत असायचा, पुढे त्याने गुंफेमध्ये राहणे सुरू केले. या काळात त्याला स्थिरता, शांती नि उसंत लाभली. गुहेमध्ये राहण्याच्या काळात आपली उसंत तो चित्र काढण्यात खर्च करू लागला. ही चित्रं काढणं दुसरं तिसरं काही नव्हतं, तर आपल्या मनातील भाव, विचारांची ती मुक्त अभिव्यक्तीच होती. ही प्रारंभीची चित्रं सांकेतिक होती. ती टोकदार दगडाने कोरलेली असायची.

वाचन/३१