Jump to content

पान:वाचन (Vachan).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मातीने सारवू लागला. त्या पोतलेल्या मातकट, काळ्या, तांबड्या भिंतीवर पांढ-या रंगाच्या मातीने तर कधी पांढ-या रंगाच्या गुहा, भिंतीवर तांबड्या मातीने कधी बोटाने तर कधी काडी, फांदीच्या टोकाने चित्रं काढू लागला. ही चित्रं एका अर्थाने माणसाची चित्रलिपीच होती. सध्याची चिनी, जपानी, कोरियन, परशियन लिप्या म्हणजे आद्यचित्रलिपीची समदर्शी वर्तमान रूपे होत. पूर्वी नुसती चित्रे असत. मग चित्रांना जोडून माणूस काही मजकूर सांकेतिक रूपात लिहू लागला. आपल्या वर्तमान लेखनप्रणालीच्या त्या पहिल्या पाऊलखुणा म्हणून ओळखल्या जातात. प्रारंभीच्या चित्रांमध्ये निसर्ग असायचा तसेच शिकार, शेतीची चित्रं असत. त्यात झाडे, जंगल, प्राणी, पक्षी, गुहा, घरे, सूर्य, नदी, डोंगर इत्यादींचे चित्रांकन असे. अशा चित्रांची झलक आपणास आजच्या आदिवासी चित्रशैलीत (वारली चित्रशैली) प्रतिबिंबित होताना दिसते. अशा चित्रलिपीतून तो स्वतः परिसराशी एकरूप होऊन आपलं जीवन, संघर्ष, प्रसंग (शिकार, नैसर्गिक आपत्ती, शेती इ.) चित्रित करत रहायचा. हे चित्रांकन म्हणजे साहित्याचे आद्य चित्ररूप. प्रारंभिक साहित्य चित्रमय अधिक तर मजकूर सूचक होता. आज लेखनास जोड म्हणून चित्रं असतात. उदाहरणार्थ, या पुस्तकातील चित्रे. म्हणून तर साहित्य हे समाज जीवनाचा आरसा बनून राहतं. त्याचं मूळ या सर्व वरील प्रक्रियेत, प्रतिक्रिया, प्रतिसाद, प्रतिबिंबात आढळतं. पुढे मग अभिव्यक्त होण्यासाठी भाषा आली; पण भाषा नि लिपीचा उगम स्वतंत्र व समांतर होत राहिला तरी तो परस्परपूरक होता. वर्तमान भाषा आणि लिपीच्या अभ्यासात असं दिसतं की, अगोदर भाषा जन्मली आणि नंतर तिचं सूचन वस्तू इ.द्वारे अक्षररूपात होत राहिलं.
३.३.२ लिपी अभ्यासाचा उद्देश

 लिपी असते काळाचं प्रतिरूप. म्हणून आज इतिहास, पुरातत्वशास्त्रात लिपीवरून कालमापन आणि निश्चिती केली जाते. देश, प्रदेश, समाजाची ओळख लिपीवरून केली जाते. तत्कालीन समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीचा बोध लिपीच करत असते. शिलालेख, ताम्रपट, नाणी, दानपत्रे, उतारे, खलिते, हस्तलिखित पोथ्या, या सर्वांचा बोध होतो तो त्यावरील मजकुरातून. या मजकुराचे माध्यम असते मात्र लिपी. गतकाल जिवंत करण्याची क्षमता लिपीत असते. म्हणून लिपी काळ, काम, वेगाचे साधन असते. व्याख्या, विश्लेषण, नोंद, इतिहास लिपीशिवाय अशक्य.

वाचन/३२