Jump to content

पान:वाचन (Vachan).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देवळे, व्यापारी, जमीनदार यांच्याकडील पशुधन, धनधान्य, वस्तू मोजण्यासाठी विविध वस्तूंचा (काठ्या, कवड्या, गजगे इ.) वापर केला जायचा. संचय वाढू लागला तशी संच पद्धती (गठ्ठे, पेंढ्या, मोळ्या इत्यादी) अस्तित्वात आली. याच्या नोंदी रेघा, रेषा, चित्रे, चिन्हे यातून होत अक्षर, अंक जन्माला आले. चित्रांची बनलेली चिन्हे म्हणजेच आजचे वर्ण, स्वर, व्यंजन, अक्षर, विरामचिन्हे होत.
 लेखनासाठी कालौघात पपायरस, भूर्जपत्रे, चामडे, शाई, रंग, कागद इत्यादींचा वापर होऊ लागला. इजिप्त, सिंधू, इत्यादी संस्कृतीत लेखन मुद्रा आढळल्या. त्यातील उत्खननातून लेखनकलेच्या प्रागैतिहासिक होण्यावर शिक्कामोर्तब झाले. भारतातील सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेली लिपी (मुद्रा) ही प्राचीन मानली जात असली तरी तिचे वाचन, संशोधन पूर्ण होऊ शकलेले नाही. संस्कृतमधील ब्राह्मी लिपी प्राचीन मानली जाते. ती सेमेटिक लिपीतून उदयाला आली असे मानले जाते. पाणिनी, कौटिल्य इ.च्या लेखनात पूर्वी लिपी असल्याचे उल्लेख सापडतात.
 बौद्ध काळातील विपुल हस्तलिखिते उपलब्ध असून, भारतात लेखनकला पूर्वापार होती हे स्पष्ट होते. सातवाहन काळातील शिलालेख (इ.स. पूर्व २५० ते २२७) उपलब्ध आहेत. नाशिक इथे सापडलेल्या शिलालेखात ‘क्षत', ‘उत्कीर्ण’, ‘लिखित' इत्यादी शब्द आढळून आले आहेत. त्यातूनही लेखन, लिपी पूर्वापार असण्याला दुजोरा मिळतो. सम्राट अशोकाच्या काळातील स्तूप, घुमट, शिलालेख, कमानी इत्यादींवर प्राचीन भाषेतील लेखन आढळून आले आहे.

 अलीकडच्या काळातील पोथ्या, दस्त, हस्तलिखिते इत्यादींमधून लिपी, भाषा विकासावर भरपूर प्रकाश पडतो. मोडी, ब्राह्मी पर्शियन, देवनागरी इत्यादी लिप्यांप्रमाणे भारतात अनेक भाषांच्या वेगवेगळ्या लिप्या व त्यातील ग्रंथ आढळून येतात. त्यातूनही भारतभर लेखन कलापद्धती अस्तित्वात होती. शिवाय काळाच्या ओघात सर्व भाषा, लिपींचा विकास दिसून येतो. भारतातील भाषा, लिपींच्या डॉ. गणेश देवी यांच्या लोक सर्वेक्षणातून यावर भरपूर माहिती आता उपलब्ध झाली आहे. भारतीय राज्यघटनेने मान्य केलेल्या २२ राजभाषा व १३ लिपींचा विचार केला तरी भारतीय लेखनाच्या इतिहासावर मोठा प्रकाश पडतो. जागतिकीकरण, सूचना आणि संपर्क क्रांती, माहिती तंत्रज्ञान युग यांमुळे छोट्या भाषा व लिपी अस्तंगत होत असून, मोठ्या संख्येने वापर, व्यवहार असलेल्या भाषा, लिपींवर होणारे

वाचन/२६