पान:वाचन (Vachan).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३. लेखन विकास
  मनुष्य मूलतः समाजशील असल्याने परस्परांशी संबंध, संवाद आणि संपर्क ही त्याची उपजत गरज राहिली आहे. प्रागैतिहासिक काळात माणसाने हे संबंध विविध मार्गाने विकसित केल्याचे आढळते. माणूस या काळात आपल्या स्मृती, घटना, प्रसंगांचे चित्रण खाणाखुणा, चिन्हे, चित्रे, संकेत इत्यादींद्वारे कोरून, चित्रण करून ठेवत असे. याशिवाय तो या काळात व्यापार, व्यवहार करू लागल्याने त्यास मोजदाद करण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी माणूस काठ्या, दगड, कवड्या, दोरीच्या गाठी यांचा वापर करू लागला. चित्रातून अभिव्यक्त होता येतं याची त्याला प्रचिती चित्र दुस-याला कळतं हे समजण्यातून येऊ लागल्याने त्यास आविष्कार, अभिव्यक्तीद्वारे अनुभूती प्रगट करण्याचा जणू छंदच जडला.

 अभिव्यक्तीची कला पूर्वी दैवी मानली जायची. चित्र, चिन्ह, लेखनाची अधिष्ठात्री देवता मानण्याचा प्रघात बॅबिलोनियन संस्कृती काळात (इ.स. पूर्व ३०००) होता. तसेच इजिप्तमध्येही होते. तिथे थॉनची पूजा कला, लेखन, संगीतासाठी केली जायची. जगातील सर्वाधिक प्राचीन लेखन कला मेसोपोटेमिया (सध्याचा इराक देश)मधील क्युनिफॉर्म लिपीच्या माध्यमातून याच काळात उगम पावली. पूर्वीच्या काळात आर्थिक नोंदी ठेवण्यासाठी चिखलाच्या ठोकळ्यांचा (Tablets) उपयोग केला जात असे. हे ठोकळे ओले असताना त्यावर मजकूर, अंक, नोंदी टोकदार साधनांनी कोरल्या जात असत. हे काम करणारे कारागीर (Sriber) कुशल असत. त्यांना चित्र, चिन्हांद्वारे मजकुरातून संकेत व्यक्त करण्याची कला (बुद्धी) अवगत होती.

वाचन/२५