पान:वाचन (Vachan).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाज वापरातून भाषिक संवाद, अर्थनिर्मिती, वहन, आदानप्रदान होत राहते.म्हणून ते प्रभावी असे संपर्क साधन, माध्यम बनते.
 असे सांगितले जाते की, सुमारे ३५ लाख वर्षांपूर्वी माणसाचे पूर्वज, पूर्ववंशीय झाडावर राहात होते. काही मानववंशशास्त्री हा काळ ६० हजार वर्षांपर्यंत अलीकडचा मानतात. ते काहीही असो; पण काळाच्या ओघात मात्र झाडावर राहणारा माणूस जमिनीवर राहू लागला हे खरे! सर्वसाधारणपणे हा काळ २५ लाख वर्षांचा मानण्यात येतो. सुमारे २० लाख वर्षांपूर्वी तो बराचसा भूचर होऊन गेला होता म्हणजे तो ऑस्टॅलो (ऑस्ट्रॅलोपेथिकस) झालेला होता. त्यामुळे त्याच्या समूहजीवनाचा प्रारंभ झाला. त्यातून त्यास संपर्क संवादाची गरज निर्माण झाली.
 झाडावरून उतरून तो जमिनीवर का राहू लागला, याचा अभ्यास करता लक्षात येते की, जसजशी जंगले विरळ होऊ लागली, तशी निवास, भोजन इत्यादींचा तुटवडा सुरू झाला. त्याची भटकंती जमिनीवर अधिक होऊ लागली आणि तो भूचर बनला. जसा तो जमिनीवर राहू लागला, तशा काळाच्या ओघात त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या. परिणामी, त्याचे शरीर उत्क्रांत झाले. शारीरिक बदल घडून आले म्हणजे नखांचा वापर कमी होऊन ती बोथट होत गेली. तीच गोष्ट सुळ्यांची, ते न वापरण्याने छोटे झाले. शिवाय बोथटही. झाडावर राहताना दूरचं दिसायचं. अंधारातही तो पाहू शकायचा. ही क्षमता तो भूचर झाल्यावर कमी झाली. पूर्वी त्याला दूरचं ऐकू येत असे. आता त्याची श्रवण क्षमता २० ते २०,००० हर्ट्झ (श्रवणमापन परिमाण) इतकी कमी झाली. त्याचे घ्राणेंद्रियही अशक्त झाले. त्या सर्वांचा परिणाम असा झाला की, पूर्वीचा सशक्त माणूस दुर्बल झाला. स्वसंरक्षणार्थ त्याला नव्या क्षमतांची गरज भासू लागली. त्याने त्या क्षमता प्रयत्नपूर्वक विकसित केल्या. भाषा त्यापैकीच एक होय. संकल्पना विकासाच्या गरजेतून भाषा कौशल्याचा विकास झाल्याचे मानले जाते.
 चार पायांवर चालणारा भूचर माणूस दोन पायांवर चालू लागण्यासही हजारो वर्षांचा काळ लोटला. दरम्यानच्या काळात पाठीवर ऊन पडण्याचे प्रमाण कमी होऊन पाठीवरचे केस क्षीण, विरळ झाले. चिंपांझी नि माणसात फरक दिसू लागला. त्याच्या आवाजात बदल झाला. आपले पिलू तो स्वतंत्र ठेवू लागला. त्याच्या संगोपनार्थ संवाद सुरू झाला. तो उभयपक्षी (रडणे थांबविणे, बाळाचे मागणे इ.) माणसाच्या बोलू लागण्याच्या या प्राथमिक पाऊलखुणा होत.

 माणूस समूहात राहू लागला, तशी श्रमविभागणी सुरू झाली.

वाचन/१८