पान:वाचन (Vachan).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संवाद,संपर्काची गरज वाढली. तो अधिक बोलका झाला. संपर्क, व्यवहार, संरक्षण इत्यादी गरजांमुळे भाषा अनिवार्य बनत गेली. अधिक बोलण्यातून त्याच्या स्वरयंत्राची उत्क्रांती घडून आली. कान, नाक, जीभ, तोंड, टाळूचा वापर वाढला. त्याचे चलनवलन वाढून चेहरा बदलला. तसा घसा, टाळू, जीभ, स्वरकंठ इत्यादीपण. समांतर मेंदूतही अनुषंगिक बदल घडत राहिले.
 ऑस्ट्रेलो क्षमतेच्या माणसात कौशल्य विकास होऊन तो होमो अर्गेस्टर झाला. म्हणजे तो विकसित मेंदूच्या आधारे हावभाव, देहबोलीचा अधिक सक्षमपणे वापर करू लागला. या बदलाचा भाषानिर्मितीत मोठा उपयोग झाला. ही ‘शब्देविण संवादू'ची अवस्था होय.
  मानवी भाषेची निर्मिती कशी झाली, याचे विवेचन करणारे अनेक सिद्धांत भाषा विज्ञानात जगभर प्रचलित आहेत. ‘पुट पुट', 'ये-हो-ये', ‘डिंग-डाँग', 'बॉब-वॉब' सिद्धांत म्हणून ते सर्वत्र चर्चिले जातात. त्यानुसार भाषा ही परिसर, प्रसंग, घटना, प्रतिसाद, प्रक्रिया इत्यादींतून जन्मते व त्यामुळेच ती परिवर्तित विकसित होत राहते.
 भाषा म्हणून सर्व भाषांची समान वैशिष्ट्ये आहेत. ती ‘भाषा विश्वके' किंवा 'केवळ वैश्विके (Absolute Universals) म्हणून ओळखली जातात. ती पुढीलप्रमाणे आहेत - १.भाषा बोलीतून जन्मते व लिपिबद्ध होते. भाषेत नाम (संज्ञा) व क्रिया स्वतंत्र असतात. म्हणून वाक्य बनते आणि भाषा आशय व्यक्त करते.
२. अपवाद वगळता कर्ता, कर्म आणि क्रिया अशी वाक्यक्रम रचना सर्व भाषांमध्ये आढळते.
३.जगातील सर्व भाषांमध्ये मी, आम्ही, आपण, तो, ती, ते, तुम्ही अशी एकवचनी, बहुवचनी (सूचक) सर्वनामे आढळतात.
४.प्रत्येक भाषेत कालसूचक क्रिया रूपे असतात. (वर्तमान, भूत, भविष्य)
५.स्वर, व्यंजन असतात; पण रचना, संख्या भिन्न आढळते.
६.सर्व भाषांमध्ये काळा, पांढरा इ. रंगासाठी स्वतंत्र शब्द आढळण्यातून भाषा म्हणजे समाज संज्ञासंग्रह असतो हे स्पष्ट होते.

७.भाषा विकासात सर्व रंग, छटा, भाव यांना शब्द लाभतात. ते म्हणजेच भाषा विकास होय.

वाचन/१९