पान:वाचन (Vachan).pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गॉर्गियस, प्लेटोच्या काळापासून भाषाविषयक ही धारणा मानवी समाजात केवळ दृढमूल झाली असे नसून,तिचा कालौघात विस्तार आणि विकास होत राहिला आहे. रुसोने भाषेस भावनिक उद्गार मानले, तर कांटने भाषेस प्रागतिक विचार व तर्काची संयुक्त निर्मिती मानले होते. विट्गेन्स्टाइनने विसाव्या शतकात तर तत्त्वज्ञानाची तुलना भाषेशी करून तिचे योगदान स्पष्ट केले आहे. नोम चॉमस्कीने भाषेला आकलन प्रक्रिया म्हणून तिचे वर्णन केले आहे.
  आज जगात सुमारे ५००० ते ७००० भाषा असल्याचे सांगण्यात येते. त्यातील एकदशांश भाषा (५००) भारतात आहे. हे भारताचे भाषिक वैविध एकीकडे वैभव, तर दुसरीकडे अडथळा आहे. भारतीय राष्ट्रीय एकात्मतेतील तो अडथळा म्हणून अनेकदा पुढे येत राहिला आहे. कॅनडा, रशिया, स्विट्झर्लंडसारखे बहुभाषी देश अशाच अनुभवातून जात असतात. मानवी भाषा सामाजिक परंपरेतून निर्माण होते, तशी समाज संक्रमणामुळे परिवर्तितही होत असते. मेंदूतील ब्रोका आणि वेर्निक स्थळे म्हणजे भाषा केंद्रे होत. तिथेच भाषा ग्रहण, आकलन, संप्रेषणादी क्रिया-प्रक्रिया मेंदुत घडत राहतात. भाषा हे मानवाचे उपजत कौशल्य नाही. ते ग्रहण करावे लागते. शिक्षण, सराव वा श्रवण, वापर या तिच्या कसोट्या होत. भाषा प्रक्रिया भावनिक, मानसिक, तार्किक अशी मिश्रित क्रिया होय. उद्गार त्याचे प्रगट रूप होय. तिची सारी मदार सामाजिक मान्यतेवर उभी असते. म्हणून एक व्यक्त भाषा बदलू शकत नाही. भाषानिर्मिती व विकास ही सामूहिक नि सार्वजनिक क्रिया होय. तिचा आधार व्याकरण, नियम असून त्यामुळे तिचे सार्वत्रिक रूप टिकून राहते.

 भाषा हा मूलत: एक चिन्ह व्यापार किंवा व्यवहार होय. भाषांतील चिन्हे सूचक असतात. ती वस्तू, स्थिती, भाव, व्यक्त करतात. एका चिन्हाचे अनेक अर्थ असू शकतात. परंतु, एका भाषेतील चिन्हे मात्र कायम असतात. ती सहसा बदलत नाहीत. वर्ण, अंक, अक्षरे काही नसून, ती सूचक चिन्हेच होत. भाषानिहाय मात्र ही सूचकता बदलते. त्यामुळे एका भाषेतील शब्द दुस-या भाषेत असेल, तर त्याचा अर्थ एकच असेल असे नाही. सूचन वैभिन्यातून भाषाभेद निर्माण होतात. लिपीपण चिन्हच असते. चिन्ह व्यवस्था पाळण्यातून, नियमातून (एकीकरण) भाषा सार्वत्रिक होत असते. त्यातून संवाद घडतो. भाषेमध्ये होणारे बदल नेहमीच मंदगतीने होतात. एखादी भाषा बदलून अगम्य, अनाकलनीय होण्यास सुमारे एक हजार वर्षांचा काळ लोटावा लागतो. भाषेतील शब्दांची भर वा लोप सामाजिक मान्यतेतून येते. अशा मान्यतेची कसोटी म्हणजे वापर.

वाचन/१७