पान:वाचन (Vachan).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतं असं की पृथ्वीवर राहणारी माणसं स्वर्गारोहण करण्यासाठी एक मनोरा बांधायचे ठरवितात. मनोरा जसा देवलोकांपर्यंत पोहोचू लागतो, तशी देवलोकांत घबराट पसरते. कारण, स्पष्ट होतं माणसाचं देवसृष्टीवरील आक्रमण, देव माणसाचा मनोऱ्याचा मनोदय तडीस जाऊ नये म्हणून शाप देतात, 'तुम्ही वेगळ्या भाषांत बोलाल. जेणेकरून तुमच्यात बेदीली माजेल. माणसाचं स्वर्गारोहणाचं मनोरथ हे मनोरथ राहून जाईल.' देवाची शापवाणी म्हणजे जगाची बहुभाषिकता.
भाषा विकासाच्या संदर्भातील मूलभूत प्रश्न
१. प्राणीसृष्टीची भाषा असते का? असल्यास ती कशी आहे?
२. माणूस बोलू का लागला?
३. विकास काळात (उत्क्रांती) माणसामध्ये कोणते बदल झाले, जेणेकरून त्याने भाषा आत्मसात केली?
४. भाषिक विकास काळात माणसाच्या मेंदूचा बोधन विकास (Cognitive Development) कशी झाली?
५.माणसाची भाषा कशी उत्क्रांत (Evolution) होत गेली?
या प्रश्नांचा शोध हाच भाषेचा शोध होय.
१.४ माणसाचा विकास (उत्क्रांती)
 आजच्या उत्क्रांत विकसित मानवाचा लाखो वर्षांचा इतिहास आहे. पूर्वीच्या माणसाचे शरीर आजच्या इतके विकसित नव्हते. त्यावेळी भाषासुद्धा आजच्या इतकी विकसित नसावी. माणसाचा भाषिक इतिहास पाहू लागलो, तर बोलीचा इतिहास दहा हजार वर्षांचा, तर भाषेचा अवघा पाच हजार वर्षांचा दिसून येतो. माणसाचा कालपट पाहता, पूर्वज असलेला मानवी वंश (होमोसेपिअन) साठ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. चार पायांवर चालणारा माणूस दोन पायांवर चालू लागल्यानंतर बोलू लागला, याचा अर्थ चालण्याचा बोलण्याशी संबंध असावा हे उघड आहे.
 कारण अन्य चार पायांचे प्राणी इतकी वर्षे उलटली तरी बोलताना दिसत नाहीत. जगात आजमितीस ७००० भाषा आहेत. पैकी काही बोली होत. जगातील या भाषा एकाच भाषेपासून निर्माण झाल्यात का? ते अद्याप ठरलेले नाही. तथापि, भाषिक साम्य (Linguistic Universe) आढळले.
बोली

 बोली हे वाचिक अभिव्यक्तीचं मूळ व्यक्तिरूप. म्हणून तिला व्यक्ती भाषा म्हणूनही ओळखलं जातं. पुढे तिला नित्य व्यापार, व्यवहार, वापरातून सामूहिक रूप प्राप्त होतं. मग ती लोकभाषा म्हणून ओळखली जाते.

वाचन/१४