१.२ माणसाचे बोलणे
भाषा फक्त माणसाला लाभली आहे; अन्य प्राण्यांत ती नाही. पिढी दर पिढी माणूस विकसित होत राहतो, ते केवळ भाषेच्याच जोरावर. भाषेद्वारे माणूस ज्ञानग्रहण, वहन, उत्सर्जन करू शकतो. भाषा हा माणसाच्या मेंदूत हरघडी घडून येणारा चमत्कार होय. माणसाने मेंदूत घडणा-या भाषिक क्रियांचा आराखडा तयार करण्यात यश मिळविले आहे. माणसाचा मेंदू ज्या ग्रहण, संवेदन, बोधन, विश्लेषण, ज्ञान प्रसारणादी क्रिया करतो, त्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांची उकल माणसाने प्रयोग, संशोधनातून सिद्धीस नेली आहे. प्राण्यांचे ‘सांगणे व माणसांचे बोलणे' यात अंतर आहे. प्राणी, पक्षी सांगू शकतात. माणूस बोलू, विचार करू शकतो. भाषा समजून घ्यायची तर आपणास उत्क्रांतीशास्त्र, मेंदूशास्त्र, प्राणीशास्त्र, व्याकरणशास्त्र समजून घ्यायला हवे.
माणूस बोलतो हे खरे आहे; पण त्याची आद्य भाषा कोणती याचा मात्र शोध लागू शकलेला नाही. म्हणून १८६६ मध्ये पॅरिस इथे स्थापन झालेल्या 'सोसायटी फॉर लिन्विस्टिक' संस्थेने जाहीरच करून टाकले होते की, ‘भाषा उगम’ आणि ‘आद्यभाषा' या दोन विषयांवरील लेख संस्थेच्या मुखपत्रिकेसाठी स्वीकारले जाणार नाहीत. कारण प्रश्न होते. त्यांची उकल होत नाही. अशा पार्श्वभूमीवर केलेले लेखन उपहासाचा विषय ठरतो.
तरी भाषा उगमाविषयी काही एक विचार जगभर झाला आहे. वेगवेगळे धर्म भाषिक उगमाविषयी काही सांगत आलेत.
१. ख्रिश्चन धर्म- माणसाने भोवतालच्या प्रदेशातील प्राणी-पक्ष्यांना नावे देण्याच्या प्रक्रियेतून भाषा उगम पावली.
२. हिंदू धर्म- शिवाच्या डमरूतून (ध्वनी) भाषा उदयाला आली.
३. आदिम जनजाती - नैसर्गिक आपत्तीतून भाषा उदयाला आली.
प्राचीन काळी ‘सारे काही देवाने निर्मियले' असा जो समज प्रचलित होता, त्यानुसार भाषा हीपण देवनिर्मिती मानली जायची. संस्कृतला 'देवभाषा' आणि नागरी लिपीस 'देवनागरी' नाव का, त्याची इथे उकल होते.
१.३ बाबेलचा मनोरा आणि बहुभाषिकत्व
मानवी जीवनात भाषांची आज आपण जी रेलचेल पाहतो, तिच्यासंदर्भात ‘बायबल'च्या जुन्या करारात ‘बाबेलचा मनोरा' नावाची एक गोष्ट आढळते.