पान:वाचन (Vachan).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बोली, लोकभाषेचे व्यवहार हे वापर सातत्यातून निर्माण होतात. एका विशिष्ट भौगोलिक प्रांत, प्रदेशातली बोली, भाषा एक असते. याचे कारण त्या विशिष्ट बोली लोकभाषा प्रांत प्रदेशातील लोक समान वाचीव, ऐकिवाच्या आधारे लोकव्यवहार करत असतात. वाचिक व श्रवण क्षमता असलेल्या प्रत्येकाची जशी भाषा असते, तशी ती नसणाच्या मूक बधिर, अंध व्यक्तीचीपण सांकेतिक वा स्पर्शभाषा असतेच. बोली वा भाषा हे माणसाचे सामाजिक व्यवहार विनिमयाचे साधन आहे. त्यासाठी वाचीव, ऐकीव पूर्वज्ञान, परंपरा, पाश्र्वभूमी आवश्यक असते. अशी माहिती म्हणजे तिची (बोली, भाषा) विशेषता. या विशेषतेतूनच बोली भाषेची विविध रूपे अस्तित्वात येतात. ध्वनी वापराच्या विशिष्ट शैली, परंपरेतून बोली आकाराला येते. त्यातून शृंखलाबद्ध एकता, सातत्य हे वापरातून विकसित होत सार्वत्रिक बनते. त्यातून विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट जनसमूहाची बोली विशिष्ट होत असते. मराठीच्या कोकणी, खान्देशी, वैदर्भी बोलींचा संबंध प्रदेश विशेषाशी निगडित आहे. बोलीत साधर्म्य असते, तसेच ते भाषेत आणि लिपीतही असते. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली भाषांमध्ये मोठे शब्दसाधर्म्य आढळते. त्याचा संबंध पूर्वापार भौगोलिक समन्वय व विनिमय हेच होय. बोली भाषांमधील एकरूपता ही सांस्कृतिक एकता, समन्वय व संपर्कातून निर्माण होत असते. बोलण्याचे साधर्म्य व सातत्य हाच बोली नि भाषेचा पाया असतो. नैसर्गिक दुर्गम व असंपर्क यामुळे बोलीचे मूळ रूप टिकून राहते. उलटपक्षी नैसर्गिक उगम व संपर्क सुविधा यांमुळे बोली वा भाषा बदलते. नदी, जंगल, डोंगरासारख्या दुर्गम भागात भाषा, बोलींची विकासगती कुंठित राहिल्याने त्यांचे मूळ रूप टिकून राहते. उलटपक्षी पठार, मैदाने, वाळवंट आदी सुगम प्रदेशांत भाषा, बोली तीव्र गतीने बदलतात, विकसित होतात. व्यक्तिसमूहातील घनिष्ठता, साधर्म्य व्यवहार हे बोलीचे बलस्थान असते. बोलीला प्रदेश मर्यादा असते, तशी वांशिक परंपराही. तिचं स्थानिकत्व हीच तिची खरी ओळख असते. भाषेचे मूळ रूप म्हणजे बोली. विशिष्ट बोली समूहाचं एकत्रित रूप म्हणजे भाषा. बोलीचं लिखित, सार्वत्रिक रूप, लिपिबद्ध स्वरूप म्हणजे भाषा.
भाषा

 भाषा हा माणसाच्या जीवनातील अनन्यसाधारण असे महत्त्व असलेला घटक आहे. इतर प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा होतो तो भाषा वैशिष्ट्यामुळे.

वाचन/१५