पान:वाचन (Vachan).pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यात वाचनाचे स्वरुप, उद्देश, वाचनाचे टप्पे विशद करून प्रभावी वाचनाच्या दहा 'टिप्स' दिल्या आहेत. वाचनोतर पाठपुरावा व्हावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. वाचनाचे जीवनातील महत्व आणि वाचनसाक्षरता स्पष्ट करून डॉ. लवटे वाचन प्रक्रिया अधोरेखित करतात. ई-बुक विषयी अगदी नवनवी माहिती देऊन वाचकाला पुस्तक खिळवून ठेवते. अनेक वाचकांनी केवळ २४ तासात पुस्तक वाचून अभिप्राय दिले आहेत.कोल्हापुरातील एका न्यायाधिशांनी पुस्तक वाचून काव्यात्म अभिप्राय दिला आहे. इंगवले या सद्गृहस्थांनी तर सोशल मीडियाद्वारे ‘वाचन' पुस्तकातील उतारा अंश दररोज प्रसिद्ध करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वाचन पुस्तकाच्या सुलभ आकलनाचे हे द्योतक आहे.   परिशिष्टात वाचकांचे हक्क, ग्रंथ सनद तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील सुभाषिते देऊन वाचकांची वाचन असोशी पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.विषयाच्या अनुषंगाने डॉ. लवटे यांनी एकाच बैठकीत, एका प्रवाहात लिहिलेली दीर्घ कविता तब्बल बारा पाने व्यापते. दीर्घ असूनही अर्थवाही असणारी त्यांची कविता पुस्तके माणसाचे अविभाज्य अंग आहे असे सूचीत करते. पुस्तके आणि मी परस्परात समरस झालोय, असा आत्मसंवाद या कवितेतून प्रकट होतो. वाचन प्रेरणा दिनी (१५ ऑक्टोबर) भाग्यश्री प्रकाशन आणि वाचनकट्टा, कोल्हापूर यांच्यामार्फत वाचन पुस्तक संदर्भ ग्रंथ ठेवून विद्यार्थ्यांसाठी प्रगल्भ वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन चळवळ बळकट करणाची ही एक विधायक कृती आहे.   आकर्षक मुखपृष्ठ आणि अंतर्मुख करणारे मलपृष्ठ (ब्लर्ब) वाचले की हे पुस्तक घेण्याचा मोह होणारच? प्रत्येकाने संग्रही ठेवण्याचे आणि इतरांना भेट देण्याचे पुस्तक म्हणून 'वाचन' या पुस्तकाची ओळख होईल. अशी खात्री वाटते! - विश्वास सुतार शिक्षणाधिकारी, कोल्हापूर ९४२०३५ ३४५२

(तरुण भारत, बेळगाव । अक्षरयात्रा । २१-१०-२०१८)

वाचन १७३