पान:वाचन (Vachan).pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाचकांची उत्कंठा वाढवितात. प्रत्यक्ष विषयप्रवेशापूर्वी वाचकाला पाच मूलभूत प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न वाचून वाचक अंतर्मुख होतील आणि अधिक सजगतेने या पुस्तकाचे वाचन करतील, अशी रचना करण्यात आली आहे.  ‘वाचन' हा लघुग्रंथ डॉ. लवटे यांनी आपल्यासमोर दोन स्तरावर स्पष्ट केला आहे. पहिला स्तर आहे वाचनाच्या उत्पत्तीचा आणि दुसरा स्तर आहे प्रत्यक्ष वाचनप्रक्रियेचा! परिशिष्टात अनभिज्ञ बाबींचा समावेश करून वाचकांना त्यांनी सुखद धक्का दिला आहे.  माणूस हा समाजशील आणि संवादशील प्राणी आहे. दुस-यांशी सातत्याने तो संवाद साधण्यास उत्सुक असतो. संवादासाठी माणूस खुणा, चिन्हे, वस्तू यांचा वापर करायचा. माणूस बोलू लागला आणि त्याचा भाषाविकास विकसित होत गेला... वाचन प्रक्रियेपूर्वी वाचनाच्या उत्पत्तीचा मूळ गाभा समजून घेणे आवश्यक ठरते. पुस्तकाच्या पहिल्या चार प्रकरणात वाचन उत्पत्तीचा उहापोह करण्यात आला आहे. अविष्कार, अनुभूती आणि अभिव्यक्ती या अंगाने माणूस व्यक्त होत असतो. बोलण्याच्या सामर्थ्याने माणसाचं व्यक्त होणं अधिक प्रभावी होतं. आज जगात ५००० ते ७००० भाषा आहेत. पैकी ५०० भाषा भारतात आहेत. परंतु फक्त बोलणे हवेत विरून जातं. आपलं कितीतरी मोठं लोकवाङ्मय मौखिक परंपरेने चालत आलं आहे. लोकगीते, लोककथा, लोकनाट्य, उखाणे, हुमाण, ऋतुगीते अशी काही उदाहरणे या पुस्तकात थोडक्यात स्पष्ट केली आहेत. लेखनलिपी आणि त्यासाठीचे साहित्य आले आणि भाषा विकासात क्रांती झाली. लेखनाचा उगम, लिपीची उत्क्रांती वाचताना डॉ. लवटे यांच्या संशोधनपद्धती आणि अचूक संदर्भाबद्दल आश्चर्ययुक्त कौतुक वाटते. भारतीय भाषा आणि लिपी याचा थोडक्यात आढावाही येथे घेतलेला दिसतो.  लेखन कलेच्या शोधामुळे पुस्तक, ग्रंथांची निर्मिती झाली. 'बुक' हा शब्द जुन्या इंग्रजीतील या BOC शब्दापासून निर्माण झाला आहे, अशी माहिती डॉ. लवटे देतात. लेखन, मुद्रण, यंत्र, ग्रंथांचे स्वरूप आणि ग्रंथवाचन याचबरोबर सर्वाधिक जुने पुस्तक कोणते याविषयीची रंजक व उपयुक्त माहिती वाचन ग्रंथाच्या वाचनानेच वाचकांनी मिळवावी.

 लिखित सामग्री समोर आली की तिचे प्रगट वा मौन वाचन करणे ही प्रक्रिया सुरू होते. वाचन ही एक भाषिक, वाचिक आणि मानसिक कृती आहे. ही प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी डॉ. लवटे यांनी पुस्तकाची एक्केचाळीस पाने खर्च घातली आहेत.

वाचन, १७२