पान:वाचन (Vachan).pdf/१११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


ज्ञानाबरोबर भाषेवरही त्याकाळी अभिजनवर्गाचा एकाधिकार असायचा. मुळाक्षरांची निर्मिती इ.स. पूर्व २००० मध्ये झाली, त्यावेळी व्यंजनेच होती. स्वर नंतर जन्माला आले ते व्यवहारात भिन्नतादर्शक शब्दांच्या गरजेतून. व्यंजन प्रयोगानंतर सुमारे १००० वर्षांनी (इ.स. पूर्व १००० मध्ये) स्वर जन्माला आले. ते रोमनांनी जन्माला घातले. शुद्ध, अशुद्धाची बोधभावना इ.स. पूर्व २०० वर्षांची. व्याकरणाचा जन्म यातूनच झाला. भाषा शुद्धीची संकल्पना शब्दांच्या सार्वजनिक उपयोगाच्या गरजेतून उदयाला आली. पूर्वी सलग लिहायचा रिवाज होता. उदाहरणार्थ मोडी लिपीतील लेखन वा इंग्रजीतील करसिव्ह लेखन यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे वाचन जात राहिले. वाचन, लेखन सार्वत्रिक करण्याच्या गरजेतून लांबपल्ल्यांची शब्दरचना (अग्नीरथगमनागमन नियंत्रक लोहताम्रपट्टिका म्हणजे रेल्वे सिग्नल) संक्षिप्त करण्याच्या गरजेतून दोन शब्दांमध्ये अंतर ठेवून लिहिण्याचा प्रघात सुरू झाला. यातून वाचन सोयीसाठी विरामचिन्हे उदयाला आली. याला इ.स.चे ९वे शतक उजडावे लागले. दोन शब्दांमधील अंतराचा प्रघात भाषिक प्रचार, प्रसाराच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला. त्यामुळे सर्वसामान्य माणूसही भाषा वापरू लागला. यामुळे श्रम, वेळ, ताणाची बचत होऊन भाषेच्या सुलभीकरणास गती आली. वाचन यातूनच विकसित होत गेले. अशा छोट्या-मोठ्या प्रयत्न उपायांमधून लिखिताचे वाचन सुबोध झाले.
  प्राचीन इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे की, पूर्वी जी लिखित चिन्हे होती (चित्र, रेघा इ.) ती अत्यंत सुबोध असायची. त्यात दोन अर्थ, अनेक अर्थ नसत. 'ता' म्हणजे ताकभात ठरलेले. भाषेचे महत्त्व गणित, व्यापाराकडून संस्कृती, संस्कारांकडे सरकत गेले. मग भाषा, वाचन व्यापक व बहुआयामी बनत गेले. पुढे तर ते विविध ज्ञानविस्तारामुळे जटिल झाले खरे, वाचन सुलभतेपूर्वी मौखिक साहित्य काळात पाठांतर, स्मरण हे वाचनाचे अंग होते. पुढे मग अक्षर वाचन परंपरा विकसित झाली. धर्मकथा, मिथककथा काळात सांगोवांगी हेच वाचन होते. मौखिक साहित्यच साहित्य होतं.

 माणसाला शेती संस्कृती विकासामुळे स्थिर जीवन जगता येऊ लागले. पोटभर अन्न मिळू लागल्याने माणसाचा मेंदू पूर्वजांच्या तुलनेने मोठा होत गेल्याची नोंद मानववंशशास्त्र इतिहासात आढळते. त्यामुळे ऐकिव, मौखिक भाषा स्थिर होऊन प्रदेश व बोलींचे अस्तित्व उदयाला आले. शेतीसाठा वाढल्याने व्यापार जन्माला आला. व्यापाराने दळणवळणास गती दिली.

वाचन/११०