पान:वाचन (Vachan).pdf/११०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


त्यामुळे मराठी मुद्राकोष २०० ते २५० घरांपर्यंत जातो. देवनागरी लिपी शास्त्रोक्त मानली जात असली, सूत्रात्मक, गणिती असली, ती संगणक उपयोगी (Computer friendly) असली, तरी नवशिक्याच्या डोक्यात शिरायला बरेच सव्यापसव्य करावे लागते. अर्थात् दोन्ही लिप्यांचे गुण-दोष आहेत; पण भाषा शिकणारा सुबोधता, अल्प प्रयत्न पसंत करत असतो (प्रयत्नलाघव वृत्तीमुळे), हे विसरून चालणार नाही.
  प्रत्येक भाषेची स्वत:ची अशी लेखन, उच्चारण पद्धती, परंपरा असते. त्यातून वाचनशैली निर्माण होते. तीही प्रत्येक भाषेची आपली अशी वेगळी असते. (म्हणजे उजवीकडून लिहायचे, वाचायचे की डावीकडून, केव्हा उच्चार करायचा, केव्हा नाही इ.) लेखन व वाचन हे परस्परांचे व्यत्यास असल्यासारखे असतात. लेखन एक, वाचन दुसरे असेही असते. (उदा. Knowledge-नॉलेज. मराठीत 'शहाणा' शब्दाचा अर्थ उच्चार, बलाघाताने बदलतो. म्हणजे 'शहाणा' शब्द हुशार व मूर्ख अशा दोन परस्पर विरूद्ध अर्थाने वापरला तरी त्याच्या लेखनात फरक नसतो.) लेखन हे कौशल्य आहे, तर वाचन ही विद्याशाखा (Faculty) आहे. लेखन आविष्करण, तर वाचन अभिव्यक्ती असते. एक उद्गार, तर दुसरा प्रभाव म्हणून प्रगट होतो. लेखन सार्वजनिक असते, तर वाचन (मौन) मात्र अगदी वैयक्तिक. वाचनात संयोगत्व असतं (Tandem) , तर लेखनात आशयार्थ दडलेला असतो.
 भाषा ही माणसास लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे, तर लिपी ही मानवी शोध व निर्मिती मानावी लागेल. अॅरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, माणसाची मौखिक भाषा ही त्याच्या मानसिक उलघालीतून उदयास आली. लिपी म्हणजे उच्चारणाचे प्रतिबिंब. लेखन आणि वाचन प्रक्रिया सर्वथैव भिन्न असल्या तरी लेखन आधी घडले मग वाचन आले. इतिहास क्रमात लेखन मूलाधार, वाचन त्याचे अन्वयनन, आकलन होय. सुमारे ६००० वर्षांपूर्वी वाचनाचा प्रारंभ झाला, तेव्हा भाषा नव्हती. होते सुटे, सुटे शब्द. तेही माणसाने शेती, व्यापाराद्वारे वस्तुसंग्रह सुरू केला तेव्हा त्याची मोजदाद

करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे प्रथम अंकीय शब्द जन्माला आले. मग वस्तुगत व्यक्तिगत शब्दांची निर्मिती झाली असे मानले जाते. ही मोजदाद करणारी माणसे म्हणजे प्रथम वाचक होत. तत्कालीन गणराज्ये मापन परिणामे (वजन, मापन इ.) निश्चित करत. त्यावेळी दास्य प्रथा असायची. दास्यांना भाषा शिकवण्यास गणराज्य काळात बंदी होती. गुलामांना शिकविणा-यांना दंड व तुरुंगवासाची शिक्षा होती.

वाचन १०९