पान:वाचन (Vachan).pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यातूनही लेखन, वाचन, भाषाभिन्नतेतून बहुभाषिकता इ.चा जन्म झाला. वेगवेगळ्या लिप्यांची, लेखनपद्धती, साधने, मोजमाप पद्धतींची देवाण-घेवाण होऊन संस्कृतीचा उदय झाला. वर्गव्यवस्था, महाजनी सभ्यता, शब्दसाधना,शस्त्रपूजा इ. व्यवहार रूढ झाले. यातूनही भाषिक प्रयोग वैविध्य व विस्तार घडून आला. परिणामी वाचनास गती आली. वाचन एकाधिकार संपुष्टात येऊन तो सार्वत्रिक आणि सार्वजनिक बनण्यास वरील सर्व परिवर्तनांतून हातभारच लागला. वाचन जगण्याचे साधन बनण्याची स्थिती म्हणजे शिक्षण व्यवस्थेची निर्मिती. हा काळ एकोणिसाव्या शतकाचा.
 विसावे शतक यंत्र युगाचे मानले गेले ते विविध शोधांमुळे. तार, रेल्वे, टेलिफोन, वीज, मोटार, बाष्पयंत्रे इत्यादींमुळे मानवी शक्तीपलीकडची कामे लीलया जशी होत गेली, तशी नवी ज्ञानसंस्कृती उदयाला आली. जागतिक आदान-प्रदानाने भाषा, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र यांच्या विस्तारांमुळे माणसाचे ज्ञान क्षितिज विस्तारले, तसे त्याचे वाचन रुंदावत जाऊन चतुरस्र बनले. जग जवळ आले. भाषांतरांमुळे ज्ञानसंपदेचे आदान-प्रदान शक्य झाले. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे संगणक क्रांती. माहिती व तंत्रज्ञान साधनांनी मुद्रित ज्ञानसाधनांना अंकीय (Digital) पोशाख चढवून ज्ञान व वाचन हे काळ, काम, वेगाच्या गृहितांपलीकडे नेऊन स्मरणाची गरज इतिहास जमा केली.

 मौखिक संपर्क, संवादांची जागा माहिती व तंत्रज्ञान युगातील संगणक,इंटरनेट, मोबाईल इ.मुळे 'ई' (इलेक्ट्रॉनिक) स्वरूपात विकसित झाले.लेखन व वाचनाच्या ई आवृत्तींची निर्मिती ही एकविसाव्या शतकाची इलेक्ट्रॉनिक साक्षरता, अंकीय साक्षरता, आभासी साक्षरता अशा नव्या स्वरूपात अवतरत गेली. ई-बुक्स, किंडल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, लॅपटॉप, मोबाईल, वायफाय,उपग्रह, दळणवळण यांतून माणूस निरंतर संपर्कशील होत २४ तास वाचक बनला. त्याचे पाहणेच वाचन झाले. संदेश, फिती, गिफ्ट, डिजिटल फोटो,फेसबुक, ट्रिटर, व्हॉट्सअॅप इत्यावरील दृक-श्राव्य संदेशन वाचनच बनून गेले. त्यांनी वाचन, लेखनांच्या पूर्वसंकल्पना बदलून टंकन, मौखिक आदेशन हेच संपर्क माध्यम बनल्याने मुद्रित वाचनसंस्कृती जागी दृक् वाचन, श्रवण संस्कृती जन्माला घातली.

वाचन/१११