पान:वाचन.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
वाचनं.

न्यूनाधिक्य कळण्यास पृथ्वीवरील अनेक देशांचे इतिहास पाहिले पाहिजेत. अशा प्रकारचा ग्रंथसंग्रह मराठीत अझून चांगलासा झाला नाहीं. तरीपण अथेन्सचें साम्राज्य-इंग्लंडचा इतिहास- 4 इंग्लंड देशाचा विस्तार - इराण - कार्थेज- ग्रीस-रोम आणि कार्थेज- तुर्कस्थान - ईजिप्त - आसिरिया - रशिया - रोमन साम्राज्याचा -हास व नाश - इत्यादि अनेक देशांचे इतिहास मराठीत झाले आहेत. यामुळे ज्ञानार्थी वाचकांची अंशतः तरी सोय झाली आहे. वरील ग्रंथांपैकी पुष्कळसे ग्रंथ विद्याभिलाषी व महाराष्ट्रास ललामभूत असे श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांनी इंग्लिश ग्रंथ- मालिकेच्या आधारे करविले आहेत. त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी व्हावे तेवढे थोडेच होणार आहे !
 मराठयांचा इतिहास बखरींतून व कागदपत्रांतून मिळत असल्यामुळें त्यासंबंधानें येथें थोडक्यांत उल्लेख केला पाहिजे. शिवाजी, संभाजी, राजाराम व शाहू यांची चरित्रे मल्हारराव चिटणीसानें बखरीच्या रूपानें लिहिली आहेत. कृष्णाजी अनंत व चित्रगुप्तकृत शिवाजीचें चरित्र प्रसिद्ध आहे. पेशव्यांची बखर सोहोनीकृत - पानपतची बखर, भाऊसाहेबांची बखर, नारा- यणराव पेशव्यांची बखर वगैरे कित्येक बखरी प्रसिद्ध झाल्या आहेत. काव्येतिहाससंग्रह, भारतवर्ष, ग्रंथमाला, इतिहाससंग्रह वगैरे मासिक पुस्तकांतून बरीच ऐतिहासिक माहिती प्रसिद्ध झाली आहे. रा. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनें नामक खंड वेळोवेळी प्रसिद्ध करून पुष्कळ उपयुक्त माहिती प्रसिद्ध केली आहे. रा. पारसनीस व खरे यांनीही या काम बरेच परिश्रम केले आहेत. पेशव्यांची दप्तरें जीं सरकारांत आहेत, त्यांतील उपयुक्त माहिती प्रसिद्ध करण्याची परवानगी सरकाराने दिली असून डे. व्ह. ट्रा. सोसायटी पुणे व मुंबईचे इतिहासभक्त शेट पुरुषोत्तम विश्राम मावजी यांनी कांहीं रोजनिशा, कैपयती वगैरे प्रसिद्ध केल्या आहेत.