पान:वाचन.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी पुस्तकें.

७७

तमासगीर असून यांनीं अनेक लावण्या केल्या. पुढे यांना विरक्ति उत्पन्न होऊन यांचे लक्ष सन्मार्गाकडे लागलें. यांच्या वेदान्तपर फटके, लावण्या वगैरे आहेत. त्या काव्यदृष्ट्या सरस आहेत. मोरोपंताची आर्या कथेंत विशेष प्रचारांत आणण्याचें श्रेय जोशीबुवांकडे आहे. मराठी सुरस काव्यांत रघुनाथ पंडित याच्या नलदमयंती स्वयंवराचा नंबर बराच वर लागतो. हें काव्य सर्वांच्या स्तुतीस पात्र झाल्यामुळे आमच्या वाचकांनी तें अवश्य वाचावें. या कवीचे गजेंद्र- मोक्ष व रामदास वर्णन अशी दोन काव्यें अलिकडे उपलब्ध झालीं आहेत. मुकुंद राजापासून तो तहत जोशीबुवांपर्यंत महा- राष्ट्रांत जे कवि निर्माण झाले, त्या सर्वाचे ग्रंथ धर्मपर आहेत. धर्म, वेदान्त, भक्ति, संतचरित्रे, प्राचीन पौराणिक कथा, कचित् व्यवहार इत्यादि विषयांवरच प्राचीन कवींनीं आपली लेखनी झिजविली आहे. त्यांनी संस्कृत वाङ्मयाचें दोहन करून स्वतंत्र असें मराठी वाङ्मय प्रथम निर्माण केलें आणि मराठी भाषेस मोहक, उदात्त व प्रगल्भ स्वरूप आणिलें.
 मराठेशाही स्थापन झाल्यापासून ज्यांना विद्येचा फारसा संस्कार नाही अशा शाहीर, गोंधळी वगैरे लोकांची काव्यस्फूर्ति स्फुरण पावली व त्यांनी आपल्या जोरदार भाषेत मराठेशाहीं- तील विविध प्रसंगांची वर्णनें गुंफून 'पोवाडे ' तयार केले. पोवाडे ह्मणून दाखवून चरितार्थाचें यांनी नवीन साधन तयार केले असून कित्येकांनीं तर या पोवाड्यांवर वर्षासनें संपादन केली ! मराठ्यांच्या इतिहासावर ह्या पोवाड्यांचा बराच प्रकाश पडत आहे. मे० आकर्थ साहेब व शाळिग्राम यांनी महत्प्रया- सानें पोवाडे मिळवून जे पुस्तक प्रसिद्ध केलें तें वाचल्याशिवाय वाचकांनी राहूं नये.
 आधुनिक कवि. - वेदान्त किंवा पौराणिक कथानकांशिवाय लिहिण्यासारखे अनेक विषय आहेत, अशी आधुनिक लेखकांची खात्री झाल्यामुळें मनोविकारांचे चित्र, सृष्टिसौंदर्यवर्णन, स्थल.