पान:वाचन.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७६
वाचन.

अभंग येत नाहीं, असा मनुष्य महाराष्ट्रांत सांपडणे विरळा ! रामदास हा तुकारामाचा समकालीन होता. यानें आमरणान्त ब्रह्मचर्य व्रत पालन केलें. याने देशाटन पुष्कळ केलें असून ठिकठिकाणी आपल्या (रामदासी) सांप्रदायाचे मठ स्थापन केले. यानें प्रपंच व परमार्थ यांची योग्य सांगड घातलेली आढळून येते. याचे दासबोध, मनाचे श्लोक, हे मननपूर्वक वाचण्या- सारखे आहेत.
 वामनपंडित या संस्कृतज्ञ महान् पंडितानें मराठींत अनेक ग्रंथ केले आहेत. याची कविता गंभीर व रसभरित आहे. यथार्थ- दीपिका नामक याची गीतेवर मोठी टीका आहे. यानें जे अनेक ग्रंथ केले आहेत, त्यांपैकी कित्येक वाचकांनीं अवश्य वाचावे. भर्तृहरीनें संस्कृतांत जीं श्रृंगार, नीति व वैराग्य शतकें केलीं, त्यांचे समश्लोकांत यानें मराठीत रूपान्तर केलें आहे. श्रीधरस्वामीची भाषा फारच रसाळ, हृदयस्पर्श करणारी व दृष्टान्तपूर्ण अशी आहे. कित्येक ठिकाणी वर्णनें तर अति सुरस आहेत. रामविजय हरि- विजय, पांडवप्रताप हे याचे ग्रंथ अगर्दी वाचण्यालायक आहेत. प्राचीन भक्तांचीं व संतांची चरित्रे ग्रथित करून महीपतीनें महाराष्ट्रावर अमित उपकार केले आहेत. ऐतिहासिक व धर्म- दृष्ट्या हीं संतचरित्रे फार महत्वाची आहेत. याचे भक्तिविजय, भक्तलीलामृत, संतलीलामृत हे ग्रंथ पाहण्यालायक आहेत. मोरोपंत हा कवि मराठींत सुप्रसिद्ध आहे. यानें मराठींत जितके ग्रंथ लिहिले आहेत, तितके क्वचितच दुसऱ्या कोणी प्राचीन कवीनें लिहिले असतील, याची भाषा प्रौढ व संस्कृतशब्दमय आहे. यानें महाभारत, रामायणें, हरिवंश, स्फुट काव्यें वगैरे अनेक ग्रंथ लिहिले आहेत. केकावली नामक यानें ईशस्तुतिपर जें एक स्वतंत्र काव्य लिहिलें आहे, तें अवश्य वाचण्यासारखें आहे. अमृतराय याने पुष्कळ कटाव व पदें केलीं आहेत. याचीं वर्णनें रसाळ व डौलदार आहेत, याची शब्दरचना विशेष चित्ताकर्षक आहे. अनंतफंदी व रामजोशी हे पूर्व वयांत