पान:वाचन.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६०
वाचन.

कवितेस प्रथम स्थळ देण्यांत येतें. याचें कारण असें कीं, काव्याचा परिणाम लोकांवर फार होत असून त्यांत सुरस व थोडक्या शब्दांत उत्तमोत्तम विचार गोंविलेले असतात. ' कवित्वं दुर्लभं लोके शक्तिस्तत्र सुदुर्लभा असें एका संस्कृत कवीनें हाटले आहे. अशाच अर्थाची इंग्रजींतही एक क्षण आहे, ती अशी. 'कवि निपजतात; ते शिकवून तयार होत नसतात. ' कवींस अंतर्दृष्टि विशेष असून ते सर्वज्ञ असतात.* त्याचें अंत:- करण अत्यंत कोमल व दयार्द्र असून इच्छित विषयांत अगदी तल्लीन असल्यामुळे त्यांचे लेख हृदयंगम होतात आणि याचमुळे त्यांचे ग्रंथ चिरकाल आदरास पात्र होतात. व्यास, वाल्मिकी, या कवींची नावें संस्कृत ग्रंथांत चिरायु झाली आहेत.तसेंच प्रीस देशाचें नांव निघालें कीं, होमरची आठवण होते. इटलीचें नांव निघालें कीं, ड्यांटे कवीची आठवण झाल्याशिवाय राहत नाहीं. रोम हाटलें कीं, व्हर्जिल पुढे येतो. इंग्लंडचें नांव निघतांच शेक्सपियरचें स्मरण झाल्याशिवाय राहत नाहीं. हिंदुस्थान हाटलें कीं, कालिदासाची सोज्वळ कीर्ति नजरे- समोर फडकू लागते. महाराष्ट्र हा शब्द उच्चारतांच रामदास,


  • कवीचें वर्णन करितांना रामदास स्वामींनी लिहिले आहे:-

की हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन ।
नाना सद्विद्यांचे भुवन | यथार्थ होय ॥ १ ॥
कवि प्रेमळाची प्रेमळ स्थिती । कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ती ।
कवि उपासकांची वाड कीर्ती । विस्तारिली ॥ २ ॥
कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसांचे ओम लोटले ।
नाना सुखांचें उचंबळलें । सरोवर हे ॥ ३ ॥