पान:वाचन.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
वाचन

किंवा ऐकाल, त्याविषयीं प्रथम नीट लक्षपूर्वक विचार करा. आपले पूर्वीचे विचार व नवीन विचार यांची वेळींच योग्य सांगड घाला. असें केल्यानें बन्याच गोष्टी तुमच्या सहज ध्यानांत राहतील. जीं कामें तुह्मांस करावयाची असतील, तीं चांगल्या रीतीनें व लक्षपूर्वक करण्याची संवय अवश्य लाविली पाहिजे. तरच तीं तुमच्या ध्यानांत राहतील. लक्ष न देतां कोणतेही काम अर्धवट करण्यापेक्षां तें न करणें बरें.
 प्रथमतः मनुष्याचा स्वभाव स्थिर व शांत असला पाहिजे. जे लोक धांदल्या व गडबड्या स्वभावाचे असतात, लक्षपूर्वक पहाण्याची, ऐकण्याची किंवा वाचण्याची ज्यांना मुळींच संवय नसते, अशा लोकांच्या ध्यानांत कोणतीही गोष्ट कचित्च बरोबर राहते. याचें कारण असें कीं, लक्षपूर्वक अवलोकन करण्याची जेव्हां संधि असते, तेव्हां त्यांनीं दुर्लक्ष्य केल्यामुळे त्यांच्या मनावर ठसा बरोबर उमटत नाहीं आणि त्यामुळे त्यांच्या ध्यानांत तां गोष्ट राहत नाहीं. कदाचित् जरी राहिली तरी वेळेवर ती त्यांना बरोबर आठवत नाहीं. गडबड्या स्वभावाच्या मनुष्यांच्या ठिकाणी तर्कशक्ति, समर्पकपणा आणि धोरण हीं फारच थोडी असतात. त्यांची विचारशक्ति कोती असते. त्यांनीं जरी पुष्कळ प्रवास केला किंवा पुष्कळ ग्रंथ वाचले, तरी त्यांच्या ज्ञानभांडारांत फारशी भर पडत नाहीं.
 कांहीं लोक शून्यवृत्तीचे असतात. सृष्टीतील अनेक वस्तु ते पाहतात संवाद, वाचन इत्यादिकांच्यायोगानें त्यांस पुष्कळ नवीन गोष्टी कळतात. परंतु त्या त्यांचे ध्यानांत राहत नाहींत. याचें कारण असें कीं, जो विषय ते हातीं घेतात, त्याकडे त्यांचें मुळींच लक्ष्य नसतां तें त्यावेळी एकाद्या भलत्याच विषयाकडे असतें. त्यामुळे ते दोन्हीही विषयांस अंतरतात. जो विषय