पान:वाचन.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचन.

पुस्तकें वाचण्याची संवय लागली ह्मणजे वाईट पुस्तकांकडे पुढें तीं ढुंकून सुद्धां पाहणार नाहींत । येथे शिक्षकांस एक सूचना करवीशी वाटते ती ही की, - शाळेतील क्रमिक पुस्तकांतील विषय मुलांकडून पाठ करवून घेऊन किंवा त्यांतील प्रश्न वारंवार विचारून त्यांना विनचूक उत्तरे देतां आली, ह्मणजे शिक्षकांची इतिकर्तव्यता संपली, असा साधारण समज आहे. जो शिक्षक अशा रीतीनें मुलांकडून अभ्यास करून घेईल, व ज्याच्या हाताखालचीं पुष्कळ मुलें परीक्षेत पास होतील तो शिक्षक चांगला, त्यास शिकविण्याची हातोटी चांगली साधली, असें ह्मणतात. परंतु हैं ह्मणणें अगदी चुकीचें आहे. याचा परिणाम असा झाला आहे कीं, घोकंपट्टीपलीकडे मुलांचें अध्ययन क्वचितच जातें. इतिहास, भूगोल, कविता, अन्वयार्थ, शब्दार्थ, व्याकरण वगैरे सर्व विषय मुलांस मुखोद्गत आले ह्मणजे अभ्यास चांगला झाला असें नव्हे. तर खऱ्या शिक्षणानें मुलें विचारशील व सुशील बनली पाहिजेत. क्रमिक पुस्तकांतील धडे मुलांस शिकवितेवेळीं पुष्कळ माहिती सांगून तो विषय त्यांच्या मनांत चांगला ठसेल, तसेंच अभ्यास करण्यांत त्यांना आनंद व करमणूक वाटून त्यांची जिज्ञासा व विचारशक्ति वाढेल, त्यांच्या ठायीं विद्येविषयीं अभिरुचि उत्पन्न होईल, विषयाचें हृदत कळून ते स्वतंत्र विचार करूं लागतील, अशी व्यवस्था करावी. शिक्षकांस खतः विद्येची व वाचनाची अभिरुचि असल्याशिवाय त्यांना शिक्षणाचे काम चांगलेसे करतां येईल, असें आह्मांस वाटत नाहीं. तसेंच शिक्षकांनी खाजगी रीतीनें मुलें एकत्र करून त्यांना उत्तमोत्तम ग्रंथ समजावून देऊन जेणें. करून विद्यार्थ्यांस विद्येची अभिरुचि लागेल, अशी व्यवस्था करावी. अज्ञ परंतु कोमल अशा मनास सन्मार्गास लावणें, त्यास सुशिक्षित करणें, ह्यासारखें दुसरें स्पृहणीय व पवित्र कर्तव्य असेल, असें आह्यांला वाटत नाहीं. इंग्लंडांत युनिव्हर्सिटी-एक्स्टेनशन नामक वरिष्ठ शिक्षणप्रसाराच्या जशा सोयी आहेत, तशा इकडे झाल्यास फार चांगले होईल व तेर्णेकरून सामान्य लोकांत विद्येचा अधिक प्रसार होईल. प्रस्तुत निबंध अनेक ग्रंथकार घेऊन व्यापक रीतिनें लिहिला आहे. यांत ज्या अनेक ग्रंथांतून आधार व उतारे घेतले आहेत, त्याबद्दल अधकर्ता त्या ग्रंथकर्त्यांचा अत्यंत ऋणी आहे.