पान:वाचन.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

वाचन हा विषय फार महत्वाचा असून या विषयावर स्वतंत्र व व्यापक निबंध लिहिला असतां, तो विद्यार्थ्यास व सामान्य वाचकांस विशेष उपयुक्त होईल असे वाटल्यावरून, प्रस्तुत निबंध लिहिला आहे. वाचनाचे महत्व केवढें आहे, हें यांत सांगितलें असून जेणें - करून चांगलीं पुस्तकें वाचण्याची लोकांस अभिरुचि लागेल असा प्रयत्न केला आहे. लहान मुलामुलींच्या हाती पडला असतां हा निबंध त्यांना समजावा, ह्मणून पुस्तकाची भाषा होतां होईल तों सुलभ घातली आहे.
 घोंकीव उत्तरें तोंडपाठ ह्मणून दाखवितां आलीं किंवा नुसत्या परीक्षा पास झाल्या, ह्मणजे विद्या आली असें नाहीं; तर खऱ्या विद्वत्तेची कसोटी कांहीं निराळी आहे. खरी विद्वत्ता प्राप्त होण्यास वाचनासारखें दुसरें उत्तम साधन नाहीं. वाचनानें मन सुसंस्कृत होते व विपुल माहिती मिळते; इतकेंच नाहीं तर त्या योगानें भाषाही चांगली अवगत होते. तुह्मी कोणतीही भाषा शिका - मग ती तुमची जन्मभाषा असो किंवा कोणतीही अन्य भाषा असो- वाचनावांचून तुमची तींत चांगलीशी गति व्हावयाची नाहीं. सारांश, वाचनापासून मनुष्यास उत्कृष्ट विचार उत्कृष्ट भाषेत व्यक्त करण्या- ची कला साध्य होते; फार तर काय, वाचन यास विद्येचें जीवन ह्यटलें असतां अतिशयोक्ति होईल, असें आह्यांला वाटत नाहीं. हह्रींच्या शिक्षणपद्धतीत वाचनाची अभिरुचि उत्पन्न होत नाहीं. ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय ! मुलांस वाचनाची आवड लहान पर्णी लागली असतां, पुढें ती आपोआपच वृद्धिंगत होते. येवढ्या- करितां शिक्षकांनीं आईबापांनीं किंवा पालकांनीं चांगलीं चांगलीं पुस्तकें मुलांच्या हातीं पड़तील, अशी व्यवस्था करावी. चांगली