पान:वाचन.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचनाची अभिरुचि.

३१

तिकडील लोहार, सुतार, काम करणारे मजूर इत्यादि गरीब लोकही आपला धंदा आटोपून वर्तमानपत्रे, मासिकपुस्तकें, ऐति- हासिक ग्रंथ, सुरस कादंबऱ्या व धर्मपर व्याख्याने वाचण्यांत आपला कालक्षेप करितात. आपल्या अल्प मिळकतींतून चांगली पुस्तकें विकत घेऊन त्यांचा संग्रह करितात. त्यामुळे ग्रंथकर्त्यांना चांगलें उत्तेजन मिळून ते काळजीपूर्वक अत्यंत परिश्रम घेऊन उत्तम ग्रंथ तयार करितात. सर जॉन लबॉक यानें एके ठिकाणी ाढले आहे कीं, पुढील पिढीत वकील, वैद्य, प्रोफेसर यांच्यापेक्षां कारागीर, शिल्पकार व मजूर हे अधिक वाचणारे निघतील; आणि असें होणें अगदीं इष्ट आहे. वाचनापासून पाश्चात्य लोकांचें पुष्कळ कल्याण झालें आहे आणि त्या बाबतींत आह्मी त्यांचें अनुकरण करणें हैं अगदीं श्रेयस्कर होणार आहे.
 सुप्रसिद्ध निबंधकार लॉर्ड बेकन यानें हाटलें आहे की, " वाचनानें मनुष्य निष्णात होतो; भाषणानें हजरजबाबी होतो आणि लेखनाच्या योगानें त्याच्या आंगीं टापटीप येते." मनुष्य निष्णात् असण्यास तो बहुश्रुत असावा लागतो. आणि वाच - माच्या योगानें बहुश्रतपणा आंगीं येतो. जगांत दोन प्रकारचे लोक असतात. एक वयोवृद्ध आणि दुसरे ज्ञानवृद्ध. वयोवृद्ध असतात त्यांना कालपरत्वें वृद्धत्व येतें. परंतु जे ज्ञानवृद्ध अस• तात त्यांचें वय जरी लहान असले, तरी बहुश्रुतपणामुळें त्यांचे विचार प्रगल्भ असतात व त्यांना जगाचा अनुभव विशेष असतो. आर्यधर्मशास्ता मनु यानें लिहिलें आहे:-

न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिरः ।
यो वै युवाप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ॥ +


 + अर्थ. - नुसते कैंस पांढरे झाल्यानें मनुष्यास वृद्धत्व येत नाहीं, जो ज्ञानी तो अल्पवयस्क असला, तरी त्याला देवादिकही मानितात.