पान:वाचन.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
वाचन.

संग्रही ठेवण्याची बुद्धि तर दूरच; परंतु ती पुस्तकालयांतून किंवा मित्रांकडून आणून वाचावीं, एवढीसुद्धां त्यांना अभिरुचि नसते ! कामधंदा केल्यावर बाकीचा वेळ ते गंजिफा, पत्ते, बुद्धिबळें किंवा बिझिक खेळण्यांत, विडया फुंकण्यांत किंवा गप्पा मारण्यांत घालवितात ! ! !
 ज्यांना विद्येचा गंध नाहीं, अशा लोकांकडून काळाचा अप- व्यय होत असल्यास त्यांत त्यांचा फारसा दोष नाहीं. परंतु जे आपणांस सुशिक्षित म्हणवितात, वेळेची किंमत ज्यांना पूर्ण माहीत आहे, अशा लोकांनी वेळेचा दुरुपयोग करणें, हैं खरो- खर त्यांना अगदी लाजिरवाणें होय ! ही शोचनीय स्थिति कधीं नाहींशी होईल ती होवो !
 आपला व्यवसाय सांभाळून फुरसदीची वेळ जर आपण ज्ञानार्जनांत - अवलोकन, बाचन, संवाद, मनन इत्यादि गोष्टींत- घालविण्याचा क्रम ठेवला, तर त्यांपासून आपणांस सहज पुष्कळ ज्ञानप्राप्ति होईल. विश्वविद्यालयांतून जरी आपणांस पदव्या मिळाल्या नसल्या तरी हरकत नाहीं. परंतु याप्रमाणे आपण जर अत्यंत काळजीपूर्वक परिश्रम करीत आहों, सरस्वतीची उपासना करीत आहों, तर आपणांस केवळ ज्ञानच नव्हे, तर लेखनकला व वक्तृत्वकला या अत्यंत उपयुक्त व स्पृहणीय कलाही साध्य होण्यासारख्या आहेत; आणि हाच ज्ञानार्जनाचा स्वतःचा खरा प्रयत्न होय. अशा प्रयत्नानेंच जॉर्ज वाशिंगटन, ऑब्रहाम लिंकन, अकबर बादशहा, शिवाजी ही मंडळी नांवलौकिकास चढली. या प्रकारची अनेक उदाहरणे देतां येतील. परंतु तीं देऊन व्यर्थ अधिक जागा अडविण्यांत अर्थ नाहीं.
 पाश्चात्य राष्ट्रांत जी जागृति दिसून येते व येवढी झपाट्यानें जी यांची प्रगति होत आहे, त्याचे कारण त्यांची वाचनप्रियता होय.