पान:वाचन.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
वाचन.

त्याची किंमत अधिक ज्ञानाच्यायोगानें मनुष्यें देवपण पावली आहेत. आपली योग्यता वाढविणें हैं प्रत्येक मनुष्याच्या हातीं असतें. स्वकष्टानें मनुष्याची जेवढी योग्यता वाढते, तेवढी दुसऱ्या कशानेही वाढत नाहीं ! 'नर करणी करे सो नरका नारायण हो जाय.' ही ह्मण सुप्रसिद्धच आहे; व हिची सत्यता जगांत श्रेष्ठपणा पावलेल्या मनुष्यांची चरित्रे वाचलीं असतां सहज कळून येणार आहे.
 ज्ञानसंपादन करण्याचें सुलभ व उत्तम साधन वाचन होय. एका ल्यॉटिन कवीनें वाचनाचा महिमा फारच मोठ्या मार्मि- कतेनें एका वाक्यांत वर्णन केला आहे. तो म्हणतो, 'वाचन मनुष्याचे वर्तन सुधारतें, त्याला रानटीपणांत राहू देत नाहीं. ' वाचनाच्या योगानें मनुष्यांस अल्प काळांत जेवढे ज्ञान मिळवितां येतें, तेवढे कोणत्याही अन्य साधनाच्यायोगानें मिळवितां येत नाहीं. जें ज्ञान मिळविण्याकरितां पूर्वीच्या लोकांस वर्षानुवर्षे खपावें लागलें, तें आपणांस सहज मिळवितां येतें. तसेंच त्यांना जे ग्रंथ पाहण्याससुद्धां मिळत नसत, असे अमूल्य ग्रंथ सुदैवानें हल्ली अगदी सुलभ झाले आहेत. मात्र आपणांस वाचनाची अभिरुचि पाहिजे, ह्मणजे झाले. सिसरोची भाषणे मिळविण्या- करितां फ्रान्स देशाहून रोम शहरी वकील पाठविण्यांत आला होता. आत्मज्ञानाविषयीं व पुर्नजन्माविषयीं पौरस्त्य देशांतील मतांचा शोध करण्याकरितां लायकरगस आणि पिथ्यागोरस यांना इजिप्त, इराण आणि हिंदुस्थान ह्या प्रदेशांत स्वतः फिरावें लागलें. ज्या ज्ञानाविषयीं सोलन आणि प्लेटो यांची कीर्ति सर्व देशभर दुमदुमत होती, तें ज्ञान संपादन करण्याकरितां त्यांना इजिप्तची सफर करावी लागली. ऐतिहासिक गोष्टींची माहिती