पान:वाचन.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
वाचन.

ग्रंथ हे सन्मित्र होत. या सन्मित्रांचा सहवास केला असतां महान् दुर्मिळ असे सुविचार आपणांस कळतात. त्यामुळे आपले विचार थोर व प्रगल्भ होतात इतकेंच नाहीं, तर आपल्या वर्तनक्रमावर त्यांचा परिणाम झाल्यावांचून रहात नाहीं. अरि- स्टाल याने एके ठिकाणीं म्हटलें आहे कीं, जे मुलांस जन्म देतात त्यांपेक्षां जे त्यांना शिक्षण देतात, अशा लोकांस अधिक मान दिला पाहिजे. ' स पिता पितरस्तासां केवलं जन्महेतवः' असें कालिदासानें रघुवंशांत म्हटलें आहे. कारण आईबाप नुसतें जीवित्व देतात; परंतु शिक्षक त्यांना सन्मार्गानें वागण्यास शिकवितात. शिकंदर बादशहा म्हणत असे कीं, 'फिलिपनें मला जन्म दिला, याबद्दल मी त्याचा जितका ऋणी आहें, त्यापेक्षां ज्याने मला ज्ञानामृत पाजिलें आहे, त्या आरिस्टाटलांचा मी अधिक ऋणी आहे.' कालिदास व शिकंदर यांनी शिक्षकां- विषयीं जें लिहिलें आहे, तें ग्रंथांस लाविल्यास अधिक शोभणार नाहीं काय ?
 ग्रंथ हे कल्पतरु होत. या कल्पतरूंपाशीं धैर्य मागा, शांति मागा, संपत्ति मागा, युद्धसामर्थ्य मागा, ईश्वरप्राप्तीचा मार्ग मागा, लो- कांचीं मनें वळविण्याचें सामर्थ्य मागा, सर्व कांहीं हजर आहे. त्यांस . मागील युद्धे, मागील लोकांच्या चालीरीति, त्यांच्या धर्मसमजुती वगैरे अनेक गोष्टी विचारा, ते सर्व सांगतील. तसेंच आकाशाच्या पोकळीत, पृथ्वीच्या पाठीवर, डोंगराच्या शिखरावर, समुद्राच्या तळाशी काय आहे, हेंही ते सांगतील. शत्रूस पादाक्रांत कसें करावें, दुष्टाची खोड कशी मोडावी, सत्संगति कशी जोडावी इत्यादि अनेक गोष्टी ते तुम्हांस समजावून देतील ! एकाद्या प्रेमळ व ज्ञानसंपन्न मित्राप्रमार्णे ते तुह्मांला मनोरंजक व बोधपर गोष्टी सांगतील. यक्षाप्रमाणें तुह्मांला विविध लोकांत व विविध प्रदेशांत नेऊन तेथील गोष्टी दाखवितील. मात्र अनन्य भावानें तुझीं त्यांची सेवा केली पाहिजे. ते जें सांगतात, ते लक्षपूर्वक ऐकिलें पाहिजे, ह्मणजे झालें.