पान:वाचन.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
ज्ञानार्जनाची पांच साधनें.

११

संशयनिवृत्ति करून घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीं. याकरितां संवादाचे महत्व विशेष आहे.
 ३ वाचन. - गुरूचा समागम होऊन त्याशी संवाद करण्यास सर्वास मिळतें असें नाहीं, आणि कदाचित् असा दुर्मिळ योग घडून आला तरी तो फार दिवस टिकत नाहीं. दैववशात् आपणास चांगले व हुशार मित्र मिळाले तरी आपली व त्यांची मैत्री नेहमीं कायम राहील; ते व आपण निरंतर एके ठिकाणी राहू; असें कोणीही सांगू शकणार नाहीं. जशी स्थिति प्राप्त होईल, त्याप्रमाणें मनुष्यास रहाणे भाग पडतें. याकरितां सर्व स्थळीं व सर्व प्रसंगी उपयोगी पडणारें असें ज्ञानाचें उत्तम साधन हाट म्हणजे वाचन होय. मनुष्य श्रीमंत असो वा दरिद्री असो, तो राजवाड्यांत राहो किंवा भिकारड्या झोंपडीत राहो, त्यास मित्र असोत वा नसोत, तो आपल्या वैभवशिखरीं असो किंवा दु:खानें त्याचें काळीज होरपळून गेलेलें असो, त्यास वाचनासारखें मनोरंजक आणि ज्ञानप्राप्तीचें सुलभ असें दुसरें साधन नाहीं.
 ज्या गांवांत आपण रहात असूं, तेथील विद्वान् लोकांशीं परिचय करून त्यांपासून आपणास ज्ञान संपादन करून घेतां येईल. परंतु त्या गांवाशिवाय अन्य गांवीं व अन्य देशीं जे विद्वान् लोक रहात असतील त्यांचा व आपला परिचय कसा होणार ? तसेंच आपले चार पांच मित्र खेरीज करून इतरांशी वादविवाद करण्यास आपणास कसें सांपडणार ? परंतु वाचनाच्या योगाने आपणास दूरदूरच्या लोकांशी, आधुनिक व प्राचीन विद्वान् मंडळींशीं सहज परिचय करून घेतां येतो व त्यांच्या उपदेशामृताचा येथच्छ लाभ घेतां येतो. इंग्लंड,फ्रान्स, जर्मनी, अमेरिका ह्या देशांतील, तसेंच आपल्या देशांत दूर प्रदेश राहणाच्या ज्ञानसंपन्न मनुष्याच्या ज्ञानाचा फायदा