पान:वाचन.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचन.

सोनें जमिनीत सांपडते. परंतु ते शोधून काढण्यास पुष्कळ परिश्रम करावे लागत असून खर्चही पुष्कळ येतो. जमीन जरी चांगली सुपीक असली, तरी तींत चांगलें पीक येण्यास तिची पुष्कळ मशागत करावी लागते, तरच तिचा विशेष उपयोग होतो. नुसता छानदार संगमरवरी दगड असून पुतळा बनत नाहीं, तर पुतळा बनविण्यास तो दगड मोठ्या कुश- लतेनें कोरून काढला पाहिजे, तो घोंटला पाहिजे. त्याचप्र• माणें नुसती बुद्धि उत्तम असली तरी तिचा काय उपयोग ? तिजवर विद्येचा संस्कार झाला तरच विद्वत्ता प्राप्त होते. ज्ञान हैं एकदम मिळत नसतें. मधमाशी ज्याप्रमाणें महत्प्रयासानें थोडा थोडा मध गोळा करिते, त्याप्रमाणें ज्ञान सदैव थोडे थोडें संपा- दन करीत गेलें पाहिजे. तें एक दोन दिवसांत मिळत नसतें, तर तें मिळविण्यास वर्षानुवर्षे श्रम करावे लागतात. ज्याचें ज्ञान त्याला; त्याची एकाद्या वस्तूप्रमाणें अदलाबदल किंवा देवघेव करतां येत नाहीं. तसेंच स्वतः परिश्रम केल्याखेरीज तें कधींही मिळत नाहीं. अशी स्थिति आहे, ह्मणूनच ज्ञानाची किंमत विशेष आहे व त्याकरितां मनुष्यकोटी एवढी खटपट करीत आहे.
 सिंह, व्याघ्र इत्यादि हिंस्र पशूंस मनुष्यानें अगदी अंकित करून टाकिलें आहे. हत्ती, घोडे, उंट इत्यादि पशूंना तो गुलामांप्रमाणे आपल्या कामी राबवून घेत आहे. जमिनीची लागवड करून तींतून आपल्या चरितार्थाकरितां धान्य, फळ- फळावळ निर्माण करीत आहे. खाणींतून मौल्यवान धातु, दगड इत्यादि अनेक पदार्थ शोधून काढून तो आपल्या गरजा भाग- वीत आहे. तसेंच हिरे, माणकें इत्यादि रत्ने काढून तो आपले शरीर सुशोभित करीत आहे. ग्रंथ लिहून क्षणार्धात नष्ट होणारे विचार अमर करून ठेवीत आहे. वायु, प्रकाश, ध्वनि या