Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऑफ्स बनवायला सुरुवात झाली. ह्या सर्व उत्पादनांना परदेशात खूप मागणी होती. बंगलोर येथील भारत अर्थ मुव्हर्स ही पब्लिक सेक्टर कंपनी ट्रॅक्टर्ससारखी मोठी यंत्रे बनवत असे. तिच्यासाठी लागणारे क्लचेस इथे तयार होऊ लागले. नंतर पिस्टन्स, पिस्टन रिंग्ज ही मोटारींना लागणारी उत्पादने आणि शेतीसाठी लागणारे फूट व्हॉल्व्ह्ज व रिफ्लेक्स व्हॉल्व्ह्ज आणि वेगवेगळे पंप्स यांचे उत्पादन होऊ लागले. कास्टिंगचे काम खूप कष्टाचे व खूप मनुष्यबळ लागणारे आहे. त्यामुळे अनेक प्रगत देश हे काम विकसनशील देशांतून ऑर्डर करतात आणि त्याचप्रमाणे देशातील अनेक मोठ्या कंपन्या हे कास्टिंग अन्य छोट्या छोट्या कंपन्यांकडून बनवून घेतात. अशा अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये वसंतरावांच्या ओळखी झाल्या होत्या. त्यांची ज्यांच्याशी विशेष जवळीक होती अशा किर्लोस्करांच्या स्वतःच्याच अनेक कंपन्या होत्या व त्यांच्याकडे इतरांकडून करून घेण्यासाठी बरेच काम कायमच असायचे. साहजिकच घाटगे-पाटील इंडस्ट्रीला कामाचा तुटवडा असा फारसा पडला नाही. पण कामगार पुरेसे कुशल नसल्याने ह्या कास्टिंग्जच्या रिजेक्शनचे प्रमाण मात्र खूप होते. या संदर्भात घाटगे-पाटील आणि किर्लोस्कर यांच्या परस्परसंबंधाबद्दल लिहायला हवे. तसे पाहिले तर लक्ष्मणराव किर्लोस्कर हे ग्रामीण महाराष्ट्रातील औद्योगिकीकरणाचे पहिले शिलेदार. स्वतःबरोबर इतर मराठी उद्योजकांनाही त्यांनी कायम हात दिला. किर्लोस्कर कारखाने हे सगळ्यांचेच प्रेरणास्थान होते. शंकरराव किर्लोस्कर कोल्हापूरला नेहमी येत. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कामात त्यांना वसंतरावांची साथ असायची. एरवीही घाटगे कुटुंबाचा आणि आणि किर्लोस्करांचा संबंध अनेक पातळ्यांवर अनेक वर्षे येत गेला. वसंतरावांचे सर्वांत मोठे बंधू विष्णुपंत बंगलोरमध्ये स्थायिक झाले होते व मैसूर किर्लोस्करच्या संचालक मंडळाचे विष्णुपंत कित्येक दशके सदस्य होते. १९४५ साली स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर जेमतेम साठ किलोमीटरवर असलेल्या किर्लोस्करवाडीशी घाटगे-पाटलांचा जवळचा संबंध राहिला. आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना घाटगे-पाटील किर्लोस्करवाडीला प्रशिक्षणासाठी पाठवत. एन. एस. ऊर्फ नानासाहेब गुर्जर, पी. डी. गुणे वगैरे किर्लोस्कर कंपन्यांचे संचालकही वसंतरावांचे वसंतवैभव | ८४ ।