Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हजारांवर जाऊन पोचली; साठ-सत्तर वेगवेगळ्या स्थानिक बँड्सची इंजिने कोल्हापुरात उपलब्ध होती. यांच्यापैकी कोणीही इंजिननिर्माते प्रशिक्षित तंत्रज्ञ नव्हते, अनेक जण तर अगदी अंगठाबहाद्दरच होते; थोडेसे नैसर्गिक कसब, बघून बघून आणि प्रयोग करून करून शिकायची वृत्ती आणि मुख्य म्हणजे परिस्थितीचा रेटा यांमुळे हा इंजिनांचा व्यवसाय कोल्हापुरात वाढत गेला. पॅको इंजिन्सचे उदाहरण घेण्यासारखे आहे. वाय. पी. पोवार हे असेच एक हिंमतबाज कारागीर, महिना पाच रुपये पगारावर एका मोटरदुरुस्ती करणाऱ्या दुकानात त्यांनी नोकर म्हणून सुरुवात गेली. पुढे ६० रुपयांचा एक मोडका लेथ विकत घेऊन त्यावर ते वेगवेगळे यांत्रिक भाग बनवू लागले. स्थानिक पॉवर हाऊसमध्ये (म्हणजे वीजनिर्मिती केंद्रात ) काम करणारे अतिग्रे आणि किर्लोस्कर कंपनीत टर्नर म्हणून काम करणारे कोठावळे या आपल्या दोन मित्रांच्या साहाय्याने त्यांनी पुढे स्वतःचे इंजिन बनवले. पोवारमथला P, अतिग्रेमथला A, कोठावळेमथला K आणि कंपनीमधले CO अशी आद्याक्षरे एकत्र करून 'पॅको' (PAKCO) हे नाव ठेवले. पुढे ही पॅको इंजिन्स खूप लोकप्रिय झाली. औद्योगिक कोल्हापूरचा विचार करताना यंत्रमहर्षी म्हादबा मेस्त्री यांचा उल्लेख आवर्जून करायला हवा. एका गरीब शेतकरी कुटुंबातून ते कोल्हापुरात पोटासाठी आले. शालेय शिक्षण जवळपास काहीच झाले नव्हते. मामासाहेब महागावकर यांच्या मोटर सर्व्हिस कंपनीत क्लीनर म्हणून नोकरी करू लागले. त्यांची हुशारी पाहून त्यांना मोटर वर्कशॉपमध्ये कामगार म्हणून नेमले गेले. लौकरच ते दुरुस्तीच्या कामात निष्णात बनले. त्यांचे खरे आडनाव शेळके; पण सगळे त्यांना मेस्त्री म्हणून हाक मारू लागले. पुढे त्यांनी स्वतःचे बॅटरी चार्ज करणारे व किरकोळ दुरुस्त्या करणारे दुकान काढले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पेट्रोल व डिझेलचा प्रचंड तुटवडा होता. प्रत्येक वाहनाला इंजिनाच्या क्षमतेनुसार कूपन्स दिली जात. त्या कूपन्सच्या बदली दिल्या जाणाऱ्या पेट्रोलचा अधिकृत दर साधारण तेरा आण्यांना एक गॅलन असायचा; पण ते पेट्रोल अगदी कमी असायचे. अधिक पेट्रोल हवे असल्यास ते ब्लॅक मार्केटमध्ये घ्यावे लागे व तिथला दर सहा ते सात रुपये गॅलन इतका होता! त्यावर इलाज म्हणून कोल गॅसचा वापर सुरू झाला. कोळशावर चालणारे बॉयलर्स वाहनाच्या मागे लावले जात. त्यांना 'गॅस प्लॅट' म्हणत. शेवटी इंजिन वाफेवरच चालते व वसंतवैभव | ५२ ।