ती वाफ आपण कोळसे पेटवूनदेखील तयार करू शकू, असा विचार त्यामागे होता. एका टाकीत कोळसे भरायचे आणि ते पेटवून पाण्याची वाफ तयार करायची व पाइपने ती इंजिनला पुरवायची, अशी त्यांची योजना होती. गाडीच्या डिकीतच कोळसा साठवला जाई. त्या काळी अनेक घरांत अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंबाचा वापर व्हायचा. तसाच काहीसा हा प्रकार होता. प्रत्यक्षातही हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला. ह्या गॅस प्लँटला साऱ्या महाराष्ट्रातून आणि तमिळनाडू- कर्नाटकातूनही मागणी येऊ लागली. असंख्य वाहनांच्या मागे तो गॅस प्लँट लावलेला असायचा व त्यातून तत्कालीन टंचाईवर लोकांनी मात केली. याच तंत्राचा वापर करून कल्पक मेस्त्रींनी पुढे डिझेलवर चालणारे एक ऑईल इंजिन तयार केले. त्यालाही खूप मागणी आली. उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी हे इंजिन वापरू लागले. विश्वास हे म्हादबांच्या एकुलत्या मुलाचे नाव; तेच त्यांनी आपल्या इंजिनला दिले. १९५७ मध्ये शिवाजी उद्यम नगर ही कोल्हापुरातली पहिली औद्योगिक वसाहत तयार झाली तेव्हा तिथे विश्वास ऑईल इंजिनचा मोठा कारखाना उभा राहिला. कुठलेही औपचारिक शिक्षण नसताना, केवळ हातातील कसब आणि डोक्यातील प्रतिभा यांच्या जोरावर, शेतकऱ्यांची गरज भागेल असे इंजिन तयार करणारे म्हादबा मेस्त्री हे कोल्हापुरात विकसित होत गेलेल्या औद्योगिकीकरणाचे प्रातिनिधिक उदाहरण मानता येईल. डिझेलच्या तुटवड्यावर कोल्हापुरात लोकांनी कशी मात केली, ह्याचे उपरोक्त उदाहरण म्हणजे आजकाल ज्याला 'जुगाड' म्हणतात त्यातलाच प्रकार. 'गरज ही शोधाची जननी असते' असे म्हणतात ते बऱ्याच अंशी खरेच आहे. ती कामचलाऊ यंत्रे तशी महागच पडायची, आणि फारशी कार्यक्षमही नसायची; पण दुसरा काही पर्यायच त्या काळी नसायचा. 'जुनं कोल्हापूर' या आपल्या पुस्तकात बाबूराव थारवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांची मानसिकतादेखील त्या काळात विकाससन्मुख नव्हती. 'करायच्या काय असल्या नव्या गोष्टी ? आहे त्यातच भागवू!' असा लोक विचार करत. १९२९मध्ये कोल्हापुरात प्रथम वीज आली; पण नंतरची कित्येक वर्षे तेथील 'पॉवर हाऊस' ह्या वीजनिर्मिती केंद्रात तयार होणारी वीज प्रत्यक्षातील वापरापेक्षा खूपच अधिक असे. कोल्हापुरात कंदिलांचाच वापर घरोघर व्हायचा. आज विजेचा तुटवडा ही आपल्यापुढची मोठी समस्या आहे; त्या काळी अतिरिक्त होणारी वीज ही मोठी समस्या होती! ती सर्व वीज वापरली जावी आणि गाडी सुरू करताना । ५३ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/५५
Appearance