Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वसंतराव घाटगे नावाच्या वटवृक्षाला फुटलेल्या या साऱ्या पारंब्या आहेत व त्याही आता खोलवर रुजून बहरल्या आहेत. आज जर वसंतराव हयात असते, तर त्यांनाही समाधान वाटले असते अशाच प्रकारची ही वंशसमृद्धी आहे. व्यक्तिगत संदर्भात विचार केला, तर वसंतराव वारले त्याला आता तीस वर्षे होऊन गेली. म्हणजेच त्यांच्या पश्चात एक पूर्ण पिढी वयात आली. त्यांना व्यक्तिशः ओळखणारी अनेक माणसे आज काळाच्या पडद्याआड गेली आहेत. त्यांचा ऐन उमेदीचा कालखंड ज्यांनी पाहिला आहे, त्यांची संख्या तर आता दिवसेंदिवस अधिकच कमी होत जाणार आहे. अशा परिस्थितीत आजच्या पिढीसाठी वसंतरावांचा, त्यांचा व्यक्तिगत पातळीवरील वारसा म्हणून, त्यांची व्यक्तिगत ओळख म्हणून, कुठल्या गुणविशेषांची नोंद करता येईल? त्यांच्या एकूण चरित्राकडे मागे वळून पाहताना त्यांची कुठली वैशिष्ट्ये भावी काळासाठी विशेष उपयुक्त म्हणून डोळ्यांपुढे येतात ? त्या दृष्टीने विचार करता वसंतरावांचा पटकन जाणवणारा एक गुण म्हणजे त्यांची अपार ज्ञानलालसा, सतत नवे ज्ञान आत्मसात करायची आस. अगदी लहानपणापासून घरी कोणीही आले, तरी त्याला ते प्रश्न विचारून भंडावून सोडत ते ह्या ज्ञानलालसेमुळेच. कॉलेजात बॉटनी शिकत असतानाही त्यांनी कायद्याचादेखील अभ्यास केला तो ह्या ज्ञानलालसेमुळेच. मुळात ज्ञानमार्गाचा हा वाटसरू प्राध्यापकी करत असतानाच ट्रक चालवायला शिकला, पुढे ह्या व्यवसायात पूर्णवेळ पडला. त्या व्यवसायाला इतर अनेक संलग्न व्यवसायांची ते जोड देत राहिले. हे सारे करत असतानाच त्यांनी स्वतःचे ज्ञानही अद्ययावत ठेवले. त्यांच्या वर दिलेल्या नीतिसंकेतांत 'आम्ही जे काम करतो, त्यासंदर्भातील आमचे ज्ञान वाढवायच्या प्रत्येक संधीचा आम्ही उपयोग करून घेऊ' हे पहिले तत्त्व आहे, हे मुद्दाम नमूद करण्यासारखे आहे. वसंतरावांनी स्वतःही वेगवेगळे शैक्षणिक कोर्स केले. ज्या व्यवसायात आपण आहोत त्या व्यवसायासाठी आवश्यक असे स्वतःचे व्यवस्थापकीय शिक्षण झालेले नाही ह्याची त्यांना जाणीव होती व त्यामुळे वेळोवेळी त्यांनी स्वतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांसारख्या वारसा वसंतरावांचा । २३७ ।