छत्रपती शिवरायांच्या स्नुषा ताराबाई यांनी स्थापन केलेले हे संस्थान मागासवर्गीयांसाठी प्रथम आरक्षण सुरू करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांमुळे इतिहासात नोंदले गेलेले. इथली काळी माती खूप सुपीक. इथली चार-पाच एकर शेती म्हणजे अन्य महाराष्ट्रातली पंधरा-वीस एकर शेती. इथल्या शेतांतून ऊस तरारला आणि गुन्हाळे सुरू झाली. त्यातूनच इथे पहिली समृद्धी आली. 'गुळाच्या रव्यावरून आलेली क्रांती' असे साताऱ्याचे कृषितज्ज्ञ आणि कोल्हापूरच्या सरकारी दूध योजनेचा ज्यांनी पाया रचला त्या चारुदत्त दाभोळकर यांनी एका लेखात तिचे वर्णन केले आहे. आचार्य अत्रे म्हणाले होते, कोल्हापूर हे पाच 'म'कारांसाठी प्रसिद्ध आहे- मछ, माती, म्हशी, माशा आणि मटण, लाखालाखाची गर्दी खेचणारी इथल्या खासबागेतील कुस्त्यांची दंगल. इथली मिसळ आणि तांबडा रस्सा-पांढरा रस्सा. महालक्ष्मी मंदिरातली आरती आणि रंकाळा तलावाभोवतीचा फेरफटका. इथल्या कोल्हापुरी चपला जगभर गेल्या. १९६० साली भारताला भेट देणान्या राणी एलिझाबेथसाठी अस्सल कोल्हापुरी साज बनवणारे सराफ दत्तोपंत कारेकरही इथलेच. वि. स. खांडेकर आणि रणजित देसाईंसारखे साहित्यिक इथलेच. श्रीपती खंचनाळे आणि गणपतराव आंदळकर यांच्यासारखे मल्ल इथल्याच लाल मातीने माखलेले. कलापूर म्हणूनही कोल्हापूरची तेवढीच ख्याती आहे. आबालाल रेहमान आणि रवींद्र मेस्त्री यांच्यासारखे चित्रकार, वसंत सरवटे आणि शि. द. फडणीस यांच्यासारखे व्यंग्यचित्रकार, भिवा सुतार आणि संजय तडसरकर यांच्यासारखे शिल्पकार इथलेच. मराठी चित्रपटांचे तर हे माहेरघरच. पन्हाळा आणि आंबाघाट, गगनबावडा आणि राधानगरी यांच्या साक्षीने असंख्य स्वप्ने सिनेमाच्या पडद्यावर रंगली, लाखो प्रेक्षकांच्या मनात फुलली. भालजी पेंढारकर आणि मास्टर विनायकसारखे चित्रपटनिर्माते, व्ही. शांताराम आणि अनंत मानेंसारखे दिग्दर्शक, बाबूराव पेंढारकर आणि केशवराव भोसलेंसारखे नटश्रेष्ठ इथलेच. महाराष्ट्र फिल्म कंपनी इथलीच आणि शालिनी सिनेटोन, जयप्रभा हे स्टुडियोही इथलेच. वसंतवैभव | २२ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२४
Appearance