या साऱ्यांच्या वारशाने कोल्हापूरची म्हणून एक विशिष्ट संस्कृती काळाच्या ओघात विकसित झाली. कोल्हापूरची माणसे इथल्या उसासारखीच. सरळसोट, उगाच आडवळणे घेणारी नाहीत. वागण्यात आणि तशीच बोलण्यातही. भाषा कडक; पण मोकळीढाकळी. माणसेही वरून कडक; पण आतून गोड. इथल्या मातीतच आणखी एक गुण असावा आहे त्या परिस्थितीचा बाऊ न करता, उपलब्ध असलेल्या साधनांनिशी, समोर येणाऱ्या अडचणींतून चिकाटीने आणि जिद्दीने मार्ग शोधायचा. काहीही शिक्षण नसताना इथले बाबूराव पेंटर मुव्ही कॅमेरा तयार करू शकले आणि म्हादबा मेस्त्री डिझेल इंजिन बनवू शकले ते बहुधा त्यामुळेच. पण कोल्हापूरची ख्याती केवळ एवढ्यापुरती नाही. राष्ट्रीय महामार्गाने पुण्याहून कोल्हापूरमार्गे बंगलोरकडे जाताना उजव्या हाताला दिसणारी एक भव्य आडवी उमारत प्रवाशांचे लक्ष हमखास वेधून घेते. प्रशस्त आवार, सुशोभित रस्ते, मोठ्या काचांची शोरूम, नव्या को मोटारी. घाटगे-पाटील उद्योगसमूहाचे हे मुख्य कार्यालय. अर्धशतकाहून अधिक काळ हा घाटगे-पाटील उद्योगसमूह हीदेखील कोल्हापूरची एक महत्त्वाची ओळख राहिली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात अनेक अडचणींवर मात करून उभा राहिलेला हा एक आधुनिक उद्योग. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभर गेलेले हे एक नाव. ह्या उद्योगाचे संस्थापक दोन वसंतराव घाटगे आणि जयकुमार पाटील. त्यांतील वसंतराव घाटगे यांची जन्मशताब्दी गेल्याच वर्षी साजरी झाली. हे चरित्र म्हणजे त्यांचा खडतर वळणावळणाचा आणि आपल्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी असा प्रवास शब्दबद्ध करण्याचा एक प्रयत्न आहे. तो प्रवास नीट समजून घेण्यासाठी आपल्याला शतकापूर्वीच्या हसूरचंपू गावापासून सुरुवात करावी लागेल. वसंतरावांचा जन्म या हसूरचंपू गावी झाला. कोल्हापूरपासून दक्षिणेला ७० किलोमीटरवर असलेले, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचे, गडहिंग्लज तालुक्यातले हे एक छोटे गाव. मागील निदान दोनशे वर्षांपासूनतरी घाटगे कुटुंबाचे वास्तव्य इथे होते. मुख्यतः शेती हेच येथील उत्पन्नाचे साधन. एकूण समाज परंपराप्रिय. जडणघडण । २३ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२५
Appearance