पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जातिव्यवस्थेने बंदिस्त आणि विस्कळीत झालेल्या हिंदू समाजात आणि धर्माच्या प्रभावाखाली संपूर्णपणे भूतकालग्रस्त झालेल्या समाजात समाजपरिवर्तनाशिवाय आपण काही कामच करू शकत नाही, म्हणून समाजपरिवर्तनाचा लढा आणि आर्थिक लढा यांचाही समन्वय झाला पाहिजे, या मुद्यावर समाजवादी मंडळी स्पष्ट होती. यामुळे वर्ग-वर्ण समन्वीत संघर्षाची भूमिका ही काही नव्याने निर्माण झालेली भूमिका आहे असे समजण्याचे कारण नाही. अपरिपक्व बुद्धीच्या पण वयाने वृद्ध असणाऱ्या जुनाट मंडळींच्या लक्षात न आलेली आणि परिपक्व कुशाग्र बुद्धीच्या नवीन क्रांतिकारक तरुणांच्या लक्षात आलेली अशी ही काही नुतन भूमिका आहे असे समजण्याचे कारण नाही. वर्ग:वर्ण समन्वयाची भूमिका ही अशी भूमिका आहे जी भारतीय समाजवाद्यांना अगदी आरंभापासून मान्य राहत आलेली आहे. समाजवादाचा मूलभूत गाभा तोच राहिला तरी भारतीय परंपरा, समाजव्यवस्था आणि परिस्थिती लक्षात घेऊन प्रश्नांची मांडणी नव्याने करावी लागेल, असे वारंवार सांगण्याचे कारण तेच होते.

नीट लक्षात घेण्याचा मुद्दा

या ठिकाणी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून एक मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितोः समाजवाद भारतीय परंपरेशी आणि भारतीय संस्कृतीच्या आत्म्याशी सुसंगत असला पाहिजे, असे हे प्रतिपादन नाही. भारताच्या परंपरागत इतिहासाशी आणि परंपरागत समाजव्यवस्थेशी सुसंवादी आणि सुसंगत राहण्याची जबाबदारी, ज्यांना घ्यायची असेल त्यांनी घ्यावी. समाजवाद्यांना ही जबाबदारी घेता येणार नाही. समाजवादी जी जबाबदारी मान्य करतात ती परंपरेशी सुसंगत असण्याची जबाबदारी नाही. जी परंपरा मोडायची आहे ती मोडण्यासाठी नीटपणे समजून घ्यावी लागते आणि त्या परंपरेचे बळ लक्षात घेऊन ती परंपरा मोडण्याचा कार्यक्रम ठरवावा लागतो. समाजवाद्यांचा हेतू परंपरावाद जतन करून समाजवाद परंपरेशी सुसंगत करण्याचा नसतो. समाजवाद्यांचा हेतू परंपरा समजून घेऊन, परिस्थिती समजून