पान:वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेऊन तिच्या विरोधी लढ्यासाठी अधिक निर्दोष कार्यक्रम उभारण्याचा असतो. हा मुद्दा नीट लक्षात घेतला म्हणजे 'आमचा समाजवादाशी विरोध नाही, मात्र तो भारतीय परंपरा व संस्कृती यांच्याशी सुसंगत असला पाहिजे,' अशी भूमिका घेणारी मंडळी व भारतीय परंपरा व संस्कृती लक्षात घेऊन समाजवादाचा लढा आखला पाहिजे असे म्हणणारी मंडळी ही परस्परविरोधी गटांत आहेत, हे कळून येते,

एक मूलभूत अडचण

भारतीय राजकारणाची अडचण ही आहे की, समाजवाद, राष्ट्रवाद आणि इहलोकवाद यांचा समन्वय झाला पाहिजे, असे समाजवादी सतत मानत आले, पण व्यवहारात त्यांना हा समन्वय साकार करता आला नाही. फक्त आर्थिक प्रश्न महत्त्वाचे आहेत अशी भूमिका घेणाऱ्या कम्युनिष्ट मंडळींनासुद्धा आर्थिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारे लढे बलवान करता आलेले नाहीत आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत, परंपरावादाचा लाभ, समाजवादाचा आग्रह नसणाऱ्या स्थितिशील मध्यममार्गी राजकारणाला मात्र झालेला दिसतो.

परस्पर विरोधी प्रक्रिया

लोकशाही ज्या अनेक प्रक्रिया एकाच वेळी सुरू करत असते त्यांपैकी एक प्रक्रिया परंपरावाद मोडण्याची आणि दुसरी प्रक्रिया परंपरावाद बळकट करण्याची अशी असते. या दोन्ही प्रक्रिया सारख्या एकमेकांत गुंतत चाललेल्या स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणात आपल्याला दिसतात. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रायः मुस्लिम समाज राष्ट्रवादी राजकारणाच्या प्रवाहात नव्हता. वायव्य सरहद्द प्रांत आणि काश्मीर हे याला अपवाद होते. या घटनेकडे वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यपूर्व काळात पाहिले जात होते. एक भूमिका ही होती की बहुसंख्य हा आपल्यावर आक्रमण करून आपल्याला गुलाम करील, आपल्यावर वर्चस्व गाजवील, अशी भीती मुसलमानांना वाटते. त्यांच्या मनातील ही भीती जर काढून टाकता आली तर