वर बोलत आले. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, अच्युत पटवर्धन आणि विशेष म्हणजे डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यापैकी कुणाचेही स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रतिपादन आपण विचारात घेतले तरी या सर्व समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांच्यामध्ये दोन कल्पना सातत्याने आपणास दिसतील. पहिली कल्पना अशी आहे की इंग्रज राजवटीपासून मुक्त होणे आणि भारत स्वतंत्र करणे, हा जो भारतीय स्वातंत्र्याचा लढा आहे, या लढयाचा शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वच दरिद्री या मंडळींच्यासाठी असणा-या दारिद्रयमुक्तीच्या लढयाशी सांधा जोडला पाहिजे. स्थूलभाषेत सांगायचे म्हणजे समाजवादासाठी चालणारा लढा आणि राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी चालणारा लढा, हे दोन लढे एकमेकांच्या विरोधी नाहीत, किंबहुना हे दोन लढे परस्परभिन्नही चालू शकणार नाहीत. स्वातंत्र्यलढा आणि समाजवादाचा लढा एकमेकांत मिसळूनच चालवले पाहिजेत. मला वाटते, कोणताही समाजवादी पक्षाचा नेता घेतला तरी स्वातंत्र्यपूर्व काळात या मुद्यावर तो निःशंक होता. सर्व समाजवाद्यांची ही समान भूमिका आहे. वर्ग-वर्ण समन्वीत संघर्षाचा हा आरंभ आहे.
कम्युनिस्ट मंडळींना मात्र ही भूमिका त्या वेळी फारशी रुचली नाही. त्यांच्यामते आर्थिक प्रश्नांवरील लढा हा सर्वांत महत्त्वाचा असा लढा आहे. उरलेले प्रश्न आर्थिक लढयावरचे लक्ष विचलित करण्यासाठी वापरले जातात. स्वातंत्र्य लढा आणि समाजवाद यांचा समन्वय करता न येणे ही भारतीय कम्युनिस्ट चळवळीची एक फार मोठी उणीव होती, असे आज बहुतेक भारतीय कम्युनिस्टांनाही वाटते. पण जर उद्या एखादा राष्ट्रवादाचा प्रश्न उपस्थित झाला तर कम्युनिस्टांना राष्ट्रवाद आणि समाजवाद या दोन्हींच्या समन्वयाशी सुसंगत भूमिका घेता येईलच असे नाही!
ज्याप्रमाणे सगळे समाजवादी राष्ट्रवादाच्या मुद्यांवर निःशंक होते त्याचप्रमाणे सामाजिक परिवर्तनाच्या मुद्दयावरही ते निःशंक होते.