आपण हेही सांगण्याची टाळाटाळ करतो, 'मग राखीव जागा या कायमच्या नाहीत. एक दिवस त्या संपणाऱ्या आहेत. त्या संपणे इष्ट आहे. म्हणून राखीव जागा केव्हा संपाव्यात या विचाराला आजच आरंभ करा.' हे तर दलितांना सांगणे दूरच राहते. आपण हे सगळेच प्रश्न सातत्याने सांगण्याची गरज आहे आणि सर्व सवलती आथिक मागासलेपणाच्या तत्त्वावर याव्यात या मागणीतील लबाडी सर्वाना समजावून सांगितली पाहिजे. या मागणीचा अर्थ असा की आर्थिक मागासलेपणाचे तत्त्व लागू पडणारा आपल्याच जातीचा माणूस पुढे येऊ शकावा याची त्यात सोय आहे आपण मेडिकल कॉलेजचे उदाहरण घेऊ. इथे जागा मर्यादित. आता जर आर्थिक मागासलेपणाचे तत्त्व लागू केले तर ज्या जागा सर्वसाधारण आहेत त्याही वरिष्ठ जमातीला मिळतील आणि राखीव जागा वरिष्ठ जमातीच्याच गरीब मुलांना मिळतील, दलितांना प्रवेशच मिळणार नाही! सर्व काही गुणवत्तेनुसार व्हावे, इतर प्रश्नांचा विचार करू नये, ही भूमिका जशी वरिष्ठ जातींच्या सोयीची आहे तशी आर्थिक मागासलेपणाची भूमिका वरिष्ठ जातींच्याच सोयीची आहे. जे मागासलेले समाजघटक आहेत त्यांची आधीच मंदगतीने चालू असणारी प्रगती बंदच करण्याचा हा उद्योग आहे.
सोज्वळ भाषेमधून असा जातीयवाद प्रकट होतच असतो. माणसांची मते पाहण्याच्याऐवजी त्याच्या जातीच पाहिल्या जातात. शेवटी, शेवटी नेहरू ब्राह्मणच की! त्यांचीच मुलगी इंदिरा गांधी आणि राष्ट्रपतिपदावर कायस्थ असला म्हणजे काय, तो पुन्हा वरिष्ठ वर्गीयच. डांगे ब्राह्मण, रणदिवे ब्राह्मण, एस् एम्. जोशी ब्राह्मण, नानासाहेब गोरे ब्राह्मण तेव्हा सर्व पक्षांचे नेते ब्राह्मणच की! आम्ही सेवा दलातील मंडळी आमच्या नेत्यांची यादी करू लागलो म्हणजे साने गुरुजी ब्राह्मण, जयप्रकाश कायस्थ ! असल्या प्रकारच्या नोंदी करणारे लोक इतरांच्या जातींच्या नोंदी करीत नसतात ते स्वतःचा