जातीयवादही दाखवत असतात! या नोंदी ब्राह्मणांच्या करता येतात, मराठ्यांच्या करता येतात, गुजरात्यात लेवा पाटलांच्या करता येतात. कर्नाटकात लिंगायतांच्या करता येतात; एकदा गांधी सवर्ण हिंदू म्हणजे आमचा नव्हे, ही भूमिका घेतली म्हणजे सगळे प्रश्नच मिटून जातात ! स्वतःला पुरोगामी मानणाऱ्या मंडळींच्या वागण्याबोलण्यात जातीयवाद किती बलवान आहे याचा शोध घेतला पाहिजे. ही सर्व मंडळी नव्या जाती सत्ताधारी करण्यात यशस्वी होऊ शकतील, पण यांना जातीयवाद मोडता येणार नाही. एखाद्या खेड्यात दलितांना पाणी भरू दिले जात नाही ही घटना सांगताना सुद्धा ज्यांना आपल्या जातीचे लोक पाणी भरू देत नाहीत याची नोंद करता येत नाही, ती माणसे अठराशे ऐंशी-नव्वद या कालखंडातील सत्यशोधकांच्यापेक्षा मनाने फार पुढे गेलेली नाहीत, इतकेच म्हणणे भाग आहे, आणि जे सदैव पुरोगामी भाषेत बोलतात, पण सत्तेचे वाटप करताना आपल्या जातीचा आणि जवळचा नातेवाईक शोधतात तेही जातीयवादाच्या फार बाहेर गेले आहेत, असे म्हणता येत नाही!
जात ही घटना थोडी चमत्कारिक अशी आहे. अशी एकही जात नसते की ज्या जातीची माणसे नसतात. जातींची माणसे असतात, त्यांना आपापल्या जातींच्याविषयी ममत्व असते. इतर जाती-जमातींच्यावर कडाडून टीका करणारी मंडळी आपल्या जातीचा प्रश्न उभा राहिला म्हणजे बोटचेपेपणाने बोलू लागतात. आपण ज्या जातीचे नाही त्या जातींवर टीका करीत बसल्यामुळे आपली जातही दुबळी होत नाही आणि ज्या जातीवर आपण टीका करतो तीही दुबळी होत नाही! जातीयवाद दुबळा करण्याचा मार्ग स्वत:च्या जातीवर टीका करणारे; आपल्या जातीच्या जातीय हितसंबंधांच्या विरुद्ध संघर्षाला उभे राहणारे लोक आपण किती प्रमाणात तयार करू शकतो, इथून आरंभ होतो. ही गोष्ट जोवर आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत जातिव्यव-