ती तशी प्रभावी आहे म्हणूनच तर वर्ग-वर्ण समन्वयाची भूमिका घ्यायची असते.
आपण परंपरावादाची शक्ती फार कमी लेखतो आहोत. मला असे वाटते की परंपरावादाची शक्ती आपण समजतो त्यापेक्षा फार जास्त आहे आणि आपल्या व्यावहारिक राजकारणामुळे परंपरावाद बळकट करण्याचा उद्योग आपण करू लागलो तर त्यातून नुसता संघर्ष वाढणार नाही, काही काळपर्यंत केवळ संघर्षच वाढला असता तर ती किंमत मी क्षम्य मानली असती, पण हा संघर्ष जातीयवाद बळकट करत जातो आणि मग आपल्या ध्येयवादाचा पराभव होतो! ही किंमत मोजायची काय, याचा विचार केला पाहिजे. आपल्या व्यावहारिक राजकारणामुळे नेमके काय घडते यांचा काळजीपूर्वक शोध घेण्याची आवश्यकता जाहे.
आसाममध्ये मुस्लिम घुसखोर बंगालमधून सतत येतात. या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले तर आसामी मंडळी जो संघर्ष उभा करतील त्याचे नेतृत्व हिंदुत्ववाद्यांच्याकडे असणार हे सांगण्यासाठी कुण्या राजकीय तज्ञाची गरज नसते. जर आसाममध्ये बाहेरच्या मंडळींना आसाममधून बाहेर काढा ही भूमिका आसामी मंडळींनी घेतली तर माणसाने बुरसटलेल्या राष्ट्रवादाच्या बाहेर पडून आंतर राष्ट्रवादी विचार केला पाहिजे, असे सांगणाऱ्या ज्योती बसूना एकदम राष्ट्रवादाच्याही खाली येऊन बंगाली माणसाचे प्रवक्ते व्हावे लागते व बंगाली लोकांच्यावरील अन्यायाच्या आम्ही प्रतिकार करू असे म्हणावे लागते ! या घटना न्याय आणि समता वाढवणाऱ्या नाहीत, त्या फुटीरपणा आणि विस्कळितपणा वाढवणाऱ्या आहेत. प्रांतवाद, जातीयवाद बळकट करणाऱ्या आहेत. हे समजून घेण्याची टाळाटाळ आपण जरी केली तरी परिणाम टळणारे नाहीत.